मुंबई : राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. विदर्भातही पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीवरील भागात सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावलेली असून खालच्या बाजूस म्हणजेच कर्नाटक, केरळ किनारपट्टीला वारे सक्रिय झाले आहेत. याचबरोबर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाचे क्षेत्र, तसेच कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर वारे सक्रिय झाल्याने सध्या राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

राज्यात अधूममधून हलक्या सरी बरसतील. मात्र, साधारण रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याचबरोबर कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, सांगली आणि सोलापूरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवार, सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी

रविवार आणि सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हे दोन्ही दिवस विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे.

तापमानात वाढ

पावसाने मागील दोन दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगाव येथे झाली. तेथे ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. याचबरोबर मुंबईतही तापमानात सतत वाढ होत आहे. यामुळे पुन्हा मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी एक अंशानी अधिक तापमानाची नोंद झाली.