MHADA Lottery 2025 / मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या १४०८ घरांसह भूखंडांच्या सोडतीचा निकाल बुधवारी (१ ऑक्टोबर) जाहीर करण्यात येणार आहे. या सोडतीसाठी ७ हजार ८८१ अर्जदार स्पर्धेत असून यापैकी कोणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार हे बुधवारी स्पष्ट होईल.

छत्रपती संभाजीनगर मंडळाने नक्षत्रवाडी, आंबेजोगाई, चिखलठाणा, सातारा, देवळाई आणि अन्य ठिकाणच्या एक हजार ३४१ घरांसह ६७ भूखंडांसाठी जूनपासून नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली होती. यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील १९३ घरांचा, तर पंतप्रधान आवास योजनेतील एक हजार १४८ घरांचा समावेश आहे. या सोडतीच्या नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे २६ सप्टेंबरची सोडतीची तारीख पुढे गेली.

आता मात्र सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र अर्जदारांची अंतिम यादी मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार या घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. एक हजार ४०८ घरांसाठी एकूण ७ हजार ८८१ अर्जदार पात्र ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

सोडतीपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देताना सोडतीची नवीन तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली नव्हती. पण आता मात्र बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सोडत पार पडणार आहे.

सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण म्हाडाच्या अधिकृत फेसबुक, युट्युब पेजवर केले जाणार आहे.