मुंबई : ‘मी उच्चपदस्थ अधिकारी आहे, तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही’ असे टोमणे मारून सतत पैशांसाठी छळ केल्यामुळे म्हाडातील उपनिबंधकांच्या पत्नीने शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत महिलेचे पुण्यात राहणाऱ्या बंधूंनी याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात महिलेचे अधिकारी पती आणि सासूविरोधात तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी सतत शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याने माझ्या बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी मृत महिलेचे पती आणि सासू यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पैशांसाठी छळ केल्याचा आरोप

मृत महिला पतीसह कांदिवली येथे प्रतिष्ठित गृहसंकुलात दोन मुलांसह रहात होत्या. त्यांचे पती म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण) मघ्ये उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. मृत महिलेच्या भावाने तक्रारीनुसार त्यांची सासू ही लग्नात कमी हुंडा दिला म्हणून टोमणे मारून त्रास द्यायची. त्यामुळे महिलेच्या वडिलांनी ८ तोळे सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या.

त्यांचे पती उपनिंबंधक असल्याने दर २ -३ वर्षांनी त्याची बदली होत असते. ते सतत महिलेवर वडिलांकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकायचा, मारहाण आणि शिविगाळ करायचा असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २०२३ साली मृत महिलेच्या वडिलांनी बापूराव कटरे याला १२ लाख रुपये आणि २०२४ साली १० लाख रुपये दिले होते. पंरतु तरीही महिलेला होणारा त्रास कमी झाला नव्हता.

‘मी उच्चपदस्थ अधिकारी तुझी सोबत राहण्याची लायकी नाही..’

माझ्या बहिणीला तिचा पती सतत पैशांसाठी त्रास द्यायचा. मी उच्चपदस्थ अधिकारी आहे. तुझी माझ्यासह राहण्याची लायकी नाही..’ असे तो सतत माझ्या बहिणीला हिणवायचा. त्याला प्रत्येक महिन्याला पगाराव्यतिरिक्त २० ते २५ लाख रुपये गैरमार्गाने मिळायचे. हे गैरमार्गाचे पैसे मुलांच्या शिक्षणाला वापरू नये असे माझी बहिण सांगत होती. त्यामुळे देखील त्यांच्यात वाद व्हायचे असे आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे. महिलेच्या वडिलांना कर्करोग झाला होता. मात्र पतीने तिला भेटायला जाऊ दिले नाही. विरोध डावलून महिला आजारी वडिलांना भेटायला गेली होती. त्यामुळे तिच्या पतीने तिला काठीने मारहाण केली होती, असाही आरोप मृत महिलेच्या भावाने तक्रारीत केला आहे.

बैठकीच्या आदल्या दिवशी संपवले जीवन

महिलेला होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही कुटुंबिताल ज्येष्ठांनी रविवार २७ जुलै बैठक आयोजित केली होती. मात्र तिच्या पतीने बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे आशेचे सर्व मार्ग बंद झाल्याने महिलेने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास कांदिवली येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रविवारी महिलेचे पती, आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे अशी माहिती समता नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता कोळपकर यांनी दिली.