मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्ज प्रक्रिया सुरु केली असताना आता कोकण मंडळानेही आपल्या प्रकल्पातील दुकानांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विरार बोळींज आणि चितळसर मानपाडा येथील एकूण ७१ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला गुरुवारी सुरुवात करण्यात आली.

म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांच्या हस्ते या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या ई लिलावाच्या माध्यमातून विरार बोळींज आणि चितळसर मानपाडा येथे परवडणाऱ्या दरात दुकान खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे.

म्हाडाच्या अनेक गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सुविधांसाठी काही दुकाने बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने केली जाते. या ई लिलावात म्हाडाच्या संबंधित मंडळाने निश्चित केलेल्या बोलीपैकी सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार दुकानासाठी विजेता ठरतो आणि त्याला दुकान वितरीत केले जाते. त्यानुसार मुंबई मंडळाकडून नियमितपणे दुकानांचा ई लिलाव केला जातो.

सध्या मुंबईतील १४९ दुकानांच्या ई लिलावाची प्रक्रिया मुंबई मंडळाकडून सुरू आहे. तर आता मुंबईकर, ठाणेकरांसाठी विरार बोळींज आणि चितळसर मानपाडा येथे परवडणारी दुकाने खरेदी करण्याची संधी कोकण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

विरार बोळींजमधील ४४ आणि चितळसरमधील २७ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रियेस गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. तर अर्ज भरून संगणकीय पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची मुदत २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ पासून पात्र अर्जदारांना संगणकीय पद्धतीने बोली लावून ई लिलावात सहभागी होता येणार आहे. तर १४ ऑक्टोबरला ई लिलावाचा निकाल सकाळी ११.०० वाजता https://eauction.mhada.gov.inhttps://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर जाहीर केला जाणार आहे. ई लिलावाच्या निकालात विजेता ठरलेल्या अर्जदाराला पुढील कार्यवाही पूर्ण करून दुकान वितरीत केले जाणार आहे.