मुंबई : दोन दिवसांपूर्वी मिठी नदीत पडलेल्या हरणाची अखेर बुधवारी पवईतील बांधकाम सुरू असलेल्या एका जागेतून सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक आणि वाइल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनने संयुक्तपणे ही मोहीम राबवून हरणाची सुखरूप सुटका केली.

वाइल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनला (डब्ल्यूडब्ल्यूए) मंगळवारी हरिण मिठी नदीत पडल्याची माहिती मिळाली. तात्काळ त्यांनी ही बाब वन विभागाला कळवली. त्यानंतर वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हरिण मिठी नदीलगतच्या एका बांधकामस्थळी अडकल्याचे निदर्शनास आले.

स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने पथकाने हरणाला बाहेर काढले. त्यानंतर त्याला लगेचच सुरक्षितपणे विहार तलावाजवळील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पवई पोलीस ठाण्यातून डब्ल्यूडब्ल्यूएला पवईतील आयटी परीक्षा केंद्राजवळील एका मोकळ्या जागेत हरीण दिसल्याचा फोन आला. त्या भूखंडात वाढलेल्या गवतात हरीण असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, या भागात बांधकाम सुरू असल्यामुळे हरणाला दुखापत होण्याचा धोका अधिक होता. त्यामुळे तातडीने त्याची तेथून सुटका करणे आवश्यक होते. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रमुख पशुवैद्यक डॉ. विनया जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हरणाला भूल देण्यात आली.

काळजीपूर्वक आखलेल्या नियोजनामुळे आणि तिन्ही संघटनांच्या समन्वयामुळे हरणाला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळाले. वैद्यकीय तपासणी दरम्यान हे हरिण प्रौढ असल्याचे समजले. दोन दिवस धावपळ केल्यामुळे ते थोडे थकलेले होते, मात्र त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. वैद्यकीय तपासणीनंतर हरणाला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.

या परिसरात हरीण आले कसे ?

  • विहार तलाव व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पवईच्या जवळ आहेत. तिथे चितळ, सांबर, हरणे मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • येथे तलाव, नाले, गवताळ भाग असून राष्ट्रीय उद्यानातून बाहेर येऊन हरीण पाण्याच्या किंवा चाऱ्याच्या शोधात अशा भागात येतात.
  • बांधकामे, रस्ते, नाले यामुळे प्राणी गोंधळतात आणि शहरी भागात शिरतात.

यापूर्वीही परिसरात नोंद

पवई, चांदिवली, अंधेरी, बोरिवली, ठाणे या भागात याआधीही हरिण व अन्य वन्यप्राणी (चितळ, कोल्हा, बिबट्या) दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.

पवईतील एका झोपडपट्टीतील घरात छपरावरिन हरिण पडल्याची घटना २०२० मध्ये घडली होती. जंगलात पळताना किंवा इतर वन्यप्राण्याने पाठलाग केल्यामुळे असे झाल्याचे सांगितले जाते. यावेळी वनविभाग आणि स्थानिक प्राणी संघटनेने त्याला जीवदान देऊन नंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द केले होते.