मुंबई : मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात रविवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी काही भाग वगळता इतर भागात पाऊस फारसा पडलेला नाही. मुंबईतही जून महिन्यातील सुरुवातीचे दिवस पावसाने उघडीप दिली. जुलै महिन्याचा सुरूवातीचा कालावधीही पावसाने दडी मारली होती. दरम्यान, रविवारीपासून मुंबईत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, पवई, दादर, वरळी, प्रभादेवी या भागात पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात मुंबईत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली होती. अनेक भागात ३२ अंश सेल्सिअसपुढे तापमान नोंदले गेले होते. मात्र, आजपासून राज्यातील सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत चांगला पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र

पश्चिम राजस्थानमध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. दक्षिण कर्नाटक ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यादरम्यान पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, लातूर, नांदेड</p>

विजांसह पावसाची शक्यता

मुंबई, ठाणे, पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि विदर्भ.

उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

मुंबईत २० जुलै पर्यंत झालेला पाऊस

मुंबईत जून आणि जुलै महिन्यातील सुरुवातीच्या दिवसांत फारसा पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या अखेरीस काही दिवस पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठता आली. जुलै महिन्यातही हीच परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २० जुलै १४२.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २८३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे.