मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, त्यांच्यापर्यंत आरोग्य सुविधा नागरिकांपर्यंत पोचविणाऱ्या ७५० आशा स्वयंसेविकांना जूनपासून मुंबई महानगरपालिकेने मानधनच दिले नाही. त्यामुळे चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधनाअभावी पोटाला चिमटा काढून त्यांना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करावे लागला, त्यापाठोपाठ अवघ्या काही दिवसांवर असलेली दिवाळीही अंधारात साजरी करण्याची वेळ येऊ नये यासाठी मुंबईतील आशा स्वयंसेविकांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी महानगरपालिकेवर माेर्चा काढण्याचा, तसेच मंगळवारी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण करणे, बालके आणि महिलांची आरोग्य तपासणी, पोषण, लसीकरण, जननी-शिशू आरोग्य योजना, गरोदर मातांची सेवा, प्रसूती प्रश्चात सेवा, कुटुंब कल्याण सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा मुंबईतील झोपडपट्टी आणि टाॅवरमधील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आशा स्वयंसेविका ऊन-पावासाची तमा न बाळगता झटत असतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७५० आशा स्वयंसेविका मुंबई महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कणा असलेल्या या ७५० आशा स्वयंसेविकांना जूनपासून महानगरपालिकेने मानधन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी अवघ्या काही दिवसांच्या अंतराने गणपती व नवरात्री हे उत्सव आले. मात्र मुंबई महानगरपालिकेने मानधनच न दिल्याने आशा स्वयंसेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवळी अवघ्या काही दिवसांवर आली असून दिवाळीपूर्वी मानधन व दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी आशा स्वयंसेविकांची आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांना आरोग्य स्वयंसेविकांइतका बोनस किंवा सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव २०२२ पासून प्रलंबित आहे. या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार, भिवंडी या महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांना दरवर्षी महानगरपालिकेकडून बोनस दिला जातो. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना बोनस देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे दिवाळीपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे बोनस किंवा सानुग्रह अनुदान व जूनपासूनचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी सर्व आशा स्वयंसेविका सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. तसेच बुधवारी एक दिवस काम बंद ठेऊन त्या आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे कोषाध्यक्ष राजेश सिंह यांनी दिली.