मुंबई : आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी शिक्षक आंदोलनाला नुकतेच राष्ट्रवादीचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यांच्या भेटीनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली असून आता उद्धव ठाकरेही शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. शिवाय, आंदोलनाच्या समर्थनार्थ कालपासून रोहित पवार यांनीही आझाद मैदानावर मुक्काम ठोकला आहे.
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे याही सहभागी झाल्या होत्या. त्यांनतर गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार हे कालपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्रभर आझाद मैदानावर मुक्काम केला असून अद्यापही ते तिथेच आहेत. शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत, तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शिक्षकांसोबत आझाद मैदानावरच थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात जयंत आसगावकर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, जमू अभ्यंकर, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हेही उपस्थित आहेत.
शरद पवार यांनी नुकतीच शिक्षकांची भेट घेतली. एका दिवसात शिक्षकांच्या प्रश्नावर मार्ग काढावा, असे शरद पवार यांनी शासनाला सूचित केले. तसेच, शिक्षक हा नवी पिढी घडवणारा घटक आहे. आज पावसात, चिखलात शिक्षक इथे बसले आहेत. ही वेळ त्यांच्यावर येणे योग्य नाही. ज्ञानदानाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले. त्यांच्यासह निलेश लंके, जितेंद्र आव्हाड, बंटी पाटील यांनीही शिक्षकांची भेट घेतली.
शरद पवार यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांनीही शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळात उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. विविध राजकीय पक्षांकडून मिळणारा पाठिंबा शिक्षकांमध्ये नवी उमेद निर्माण करत आहे.