मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षात छट पूजेचे प्रस्थ वाढत असून या सणाचाही आता मुंबई महापालिकेवर ताण आला आहे. जास्तीत जास्त सुविधा द्याव्या यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी आग्रही असून कमी सुविधा दिल्याबद्दल मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नुकताच एका बैठकीत जाब विचारला.
भाजपचे पारंपरिक मतदार असलेल्या उत्तर भारतीयांना खूष करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी यंदा हा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी नियोजन केले आहे. पुढील महिन्यात बिहार विधानसभेची निवडणूक होणार असून गावी जाऊन मतदान करणाऱ्या मतदारांनाही या माध्यमातून खूष केले जात असल्याची चर्चा आहे.
उत्तर भारतीयांचा विशेषत: बिहारी लोकांचा मोठा सण असलेला छट पूजा हा सण यंदा २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. दिवाळी झाली की उत्तर भारतीयांना छट पूजेचे वेध लागतात. गेल्या काही वर्षात मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या वाढली असून छट पूजेचे प्रस्थही वाढले आहे. उत्तर भारतीय हे भाजपचे पारंपरिक मतदार असून पालिका निवडणूकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी भाजपने ही संधी साधली असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यात बिहारमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. अनेक बिहारी लोक मतदानासाठी आपापल्या गावी जातात. त्यामुळे या मतदारांना खूष करण्यासाठी छट पूजेला जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी भाजप आग्रही आहे.
छट पूजेसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्या याकरीता मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पालिका मुख्यालयात एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी गेल्या आठवड्यात छट पूजा आयोजित होणाऱ्या पूजा स्थळांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी जुहू चौपाटी, वरळी जांबोरी मैदान या परिसरात महापालिकेडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. महिलांना कपडे बदलण्यासाठी पुरेशा खोल्या उपलब्ध करून न दिल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यामुळे महापालिकेने आता ४०३ तात्पुरत्या खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुंबई महापालिकेने दिल्या सुविधा …
समुद्र किनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून सुमारे ६७ ठिकाणी छठपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ व सुरक्षित असे एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वाधिक तलाव घाटकोपर, दहिसर, कांदिवली परिसरात आहेत.
गेल्यावर्षी मुंबई महानगरपालिकेने ३९ ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावर्षी उत्सव साजरा करण्यासाठीची ठिकाणे आणि कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे. अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, वाहने व साधनसामग्री, पूजा स्थळांवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व धूम्रफवारणी यावर भर दिला जाणार आहे. सर्व पूजास्थळांवर निर्माल्य कलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा, टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी ४०३ तात्पुरती वस्त्रांतरगृह उभारण्यात आली आहेत.
