मुंबई : महानगरपालिकेने स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून त्यातून एक लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. नागरी वने, उद्यानांची देखभाल केली जात आहे. ‘हरित क्षेत्र’ वाढवण्यावर भर दिला जात आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा उद्यानासाठी घेण्यात आली आहे. मुंबई किनारी मार्ग आणि महालक्ष्मी रेसकोर्स मैदान मिळून सुमारे ३०० एकर जागेवर ‘मुंबई सेंट्रल पार्क’चे काम लवकरच सुरू होईल. त्यासाठी जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छोत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी एकनाथ शिंदे व कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री व मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रमदान केले. त्यावेळी शिंदे बोलत होते.
स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूत, वास्तवातील ‘हिरो’ आहेत. मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि स्वच्छ – सुंदर शहरासाठी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) सातत्याने सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात, तसेच राज्यात ‘एक तास स्वच्छतेसाठी’ अभियान सुरू आहे. हे अभियान वर्षभर म्हणजेच ३६५ दिवस सातत्याने सुरू ठेवायचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेतल्यास देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने देशात कोट्यवधी स्वच्छतागृहे उभी राहिली.
पिण्याचे शुद्ध पाणी कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असे गौरवोद््गार त्यांनी काढले. दरम्यान, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पुढील दीड – दोन वर्षात मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईकरांना रस्त्यावर एकही खड्डा शोधून देखील सापडणार नाही, यादृष्टिने हा प्रकल्प राबवत आहोत, असे ते म्हणाले.
नगर विकास विभागाने घनकचरा टाकण्यात येणारी सुमारे १९ हजार ९४० ठिकाणे शोधली आहेत. त्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. राज्यभर स्वच्छताविषयक लोकसहभागाचे ६ हजार ३१७ कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छ हरित महोत्सव देखील घेण्यात येणार आहे. तसेच, प्रभात फेरी, स्वच्छता कामगार सन्मान, पायाभूत सुविधांचे लोकार्पण, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान, सर्वोत्कृष्ट नागरी स्वयंसेवक सन्मान असे विविध उपक्रम ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये राबविले जाणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
स्वच्छतेविषयक सामूहिक शपथ
महानगरपालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्रो चित्रपटगृह – फॅशन स्ट्रीट) परिसरात लोकसहभागातून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्ते, पदपथ स्वच्छ करून पाण्याने धुवून काढण्यात आले. तसेच, स्वच्छतेविषयक सामूहिक शपथ घेण्यात आली. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, महानगरपालिका उपायुक्त चंदा जाधव, ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे आदी उपस्थित होते.