मुंबई : काही वर्षांपूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती, वाहनांची वाढलेली वर्दळ यामुळे ध्वनी आणि वायू प्रदुषणाचा वाढता विळखा लक्षात घेऊन ‘ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन’ने वृक्षारोपणाचा संकल्प सोडला आणि हजारो झाडांची लागवड केली. दोन-तीन वर्षे देखभाल करून झाडे जगवली, वाढवली. याच महामार्गावर टेबुबियाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून या वृक्षांमुळे डिसेंबर-जानेवारीत मुंबईला गुलाबी साज लाभतो. पण आता त्या सर्वच वृक्षसंपदेवर पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणामुळे गंडांतर आले आहे. ‘विकास जरूर करा, पण पर्यावरण भकास करू नका, योग्य पर्याय निवडून शक्य तितकी झाडे वाचवा’, अशी कळकळीची विनंती ‘ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन’ने केली आहे.

गेल्या दोन – तीन दशकांमध्ये उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतींमुळे मुंबईचे रुपच बदलून गेले आहे. केवळ इमारतीच नव्हे तर विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी धुळ मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक बनू लागली आहे. टोलेजंग इमारतींबरोबरच वाढती वाहनसंख्या प्रदूषणामध्ये भर घालत आहे. काही वर्षांपूर्वी ठाण्यातून विक्रोळीत वास्तव्यास आलेल्या विक्रम यंदे यांचे पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणे-जाणे वाढले आणि वाढत्या प्रदुषणावर काही तरी उपाय करण्याचा संकल्प त्यांनी ‘ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून हाती घेतला. वृक्ष लागवडीची आवड असलेली काही मंडळी या संकल्पाला जोडली गेली आणि २०१५ मध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर ते ठाणे (मुलुंडपर्यंत) दरम्यानच्या सेवा रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवडीला सुरुवात केली.

गेल्या १० वर्षांमध्ये ‘ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून विविध प्रजातींच्या सुमारे ३५०० झाडांची लागवड करण्यात आली. कार्यकर्ते केवळ झाडांची लागवड करून थांबले नाहीत, तर त्यांनी सलग दोन-तीन वर्षे झाडांचे संगोपन केले. पूर्व द्रुतगती महामार्गावर २०१५ मध्ये लागवड केलेले वड, पिंपळ आदी विविध प्रजातीचे वृक्ष आजघडीला मोठे झाले आहेत. परंतु आता पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारिकरणात या वृक्षांवर गंडांतर आले आहे. या संदर्भात ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशनने मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान अधिक्षकांना पत्रही पाठवले आहे.

घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नवघर आणि मुलुंड भागातील अनेक नागरिक सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात चालणे, धावणे, सायकलिंग, स्केटिंग, तसेच पर्यावरणस्नेही व्यायामासाठी या परिसरात एकत्र येतात. या परिसरातील पिंक ट्रम्पेट वृक्षांच्या ओळी मुंबईच्या हरित सौंदर्याची ओळख बनली आहे. डिसेंबर – फेब्रुवारी दरम्यान ही झाडे फुलांनी बहरतात आणि हा महामार्ग सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पण आता ११०० हून अधिक वृक्षांवर गंडातर आले असून ‘ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन’ने लागवड केलेल्या सुमारे ३५० हून अधिक झाडांचा त्यात समावेश आहे. या सर्व झाडांवर नोटीस लावण्यात आली आहे. आणखी काही झाडांवर लवकरच नोटीस लावण्यात येईल आणि ही सर्व झाडे हटविण्यात येतील आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होईल, अशी भिती विक्रम यंदे यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत झपाट्याने विकास होत असून ती काळाची गरज आहे. परंतु विकास साधताना तो वृक्षसंपदेच्या मुळावर उठू नये इतकीच माफक अपेक्षा आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा बहरलेले वृक्ष तोडावे लागणार आहेत. पूर्व मुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत करण्यात येणारा विकास महामार्गाच्या एकाच बाजून करावा. म्हणजे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूचे वृक्ष वाचवता येतील. प्राणवायूचे प्रमाण वाढावे यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर पिंपळ वृक्षांची लागवड करण्यात आली होती, तीही तोडली जाणार आहेत, असे विक्रम यंदे यांनी सांगितले.

झाडे ही केवळ सौंदर्यवर्धक घटक नाहीत, तर ती प्रदूषण कमी करतात. तापमान नियंत्रित ठेवतात. नागरिकांना सावली देतात. तीच मुंबईच्या आरोग्याची खरी फुफ्फुसे आहेत. त्यामुळे यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. मागणीचा विचार न झाल्यास वृक्ष संवर्धनासाठी स्वाक्षरी मोहिमेसह अन्य आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा यंदे यांनी दिला आहे.

पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तार प्रकल्पात काही फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वृक्ष वाचवण्यात यश येईल. तसेच या परिसरात टेबुबियाची १७८ झाडे आहेत. विस्तार प्रकल्पात त्यापैकी ५१ झाडे जात आहेत, असे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.