मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही भागात ढगाळ वातावरण आहे, तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. परिणामी सध्या अनेक भागात पाऊस पडत आहे. याचबरोबर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैऋत्येकडे सरकले आहे. पुढील २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह इतर काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी देखील पाऊस पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर काहीसा वाढला. सीएसएमटी, कुलाबा, भायखळा, परळ, वरळी , पवई, बोरिवली, घाटकोपर या भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबर ठाणे, नवी मुंबई भागातही पाऊस पडत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमानातही काहीशी घट झाली आहे. उकाड्याने काहिली झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे समाधान मिळाले. मुंबईबरोबरच इतर भागातही पावसाने हजेरी लावली.
पावसाची शक्यता कुठे?
किनारपट्टी भागात सोमवारपर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. त्याचबरोबर गुजरात भागात ३० ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच केरळमध्ये २८ ऑक्टोबर पर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तापमान दिलासा
राज्यात पाऊस पडत असल्याने तापमानात घट झाली आहे. गेले दोन तीन दिवस तापमान सरासरी इतके नोंदले जात आहे . ज्या भागात तापमानाचा पारा ३५ अंशापुढे नोंदला जातो होता. त्या भागातील तापमानात आता बऱ्यापैकी घट झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले आहे. अकोला येथे रविवारी २९.२ अंश सेल्सिअस, बुलढाणा २९.२ अंश सेल्सिअस, गोंदिया २९.६ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर इतर भागातही तापमानाचा पारा ३० ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान होता.
