मुंबई : मनसेबरोबर युती केल्यास त्याचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फायदाच होईल, असा सूर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी लावला. त्यावर युतीबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ठाकरेंसोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी मनसेबरोबर युती करण्यास अनुकूल वातावरण असल्याचे मत या बैठकीत वर्तवले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पक्षासोबत युती करण्याआधी सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. जे माजी नगरसेवक कायम पक्षासोबत राहिले त्यांचे ठाकरेंनी आभार मानले. येत्या काळात अनेक बैठका घेतल्या जातील. शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडले जाणार असल्याची माहिती त्यांनी नगरसेवकांना दिली. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते. तेव्हा शिवसेना भवन येथे बसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकवायचाच आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज ठाकरेंसोबत युती करायची की नाही यावर दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केले जात आहे. राज ठाकरे यांच्या फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतरही उद्धव ठाकरे गटाकडून युतीसाठी सकारात्मक असल्याचेच सांगण्यात आले आहे. मनसेकडून शिवसेना दरवेळी प्रस्तावावर भूमिका घेत नसल्याची तक्रार करण्यात येत होती.
‘हात मिळवल्यास फायदाच’
आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्याशी युतीसाठी पक्षाची तयारी आहे. पुढील निर्णय हा राज ठाकरे यांनीच घ्यायला हवा असा संदेश ठाकरे गटाकडून पोहोचवला जात आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीत माजी नगरसेवकांनी मनसेशी युती करण्यास अनुकूलता दर्शवली. मात्र सर्वांना विश्वासात घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.