मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा, आमदार झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खान यांना धमकी दिल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव गुरफान खान असून, त्याने खंडणी मिळवण्यासाठी धमक्या दिली. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून त्याने धमकी दिली. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
झिशान सिद्दीकी यांनी जनतेकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी कार्यालयात एक मोबाइल क्रमांक कार्यरत केला होता, यावर आरोपीने धमकीचे संदेश पाठवले आहेत. वांन्द्रा (पूर्व) येथील निर्मल नगर पोलिसांनी सोमवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला, त्यानुसार गुन्हे शाखेने सोमवारी खानला अटक केली. खानने २५ ऑक्टोबर रोजी स्वतःच्या मोबाइल क्रमांकावरून धमकीचा संदेश पाठवला होता. या संदेशात सिद्दीकी आणि सलमान खान यांना ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
u
सिद्दीकी यांच्या वांद्रे (पूर्व) कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना संदेशाबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. सिद्दीकी यांचा कर्मचारी रितेश मोरे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर, निर्मल नगर पोलिसांनी मोबाइल क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२), ३०८ (५), आणि ३५१ (१) अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले असून तो दूरध्वनी नोएडा येथील एक व्यक्ती वापरत असल्याचे शोधून काढले. प्राथमिक तपासानुसार त्याने खंडणीसाठी धमकीचे संदेश पाठवले होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा…आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी क्रमांक १०१ व १९१६ वर संपर्क साधावा, मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन
झिशान सिद्दीकी यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे (पूर्व) येथे लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत १५ आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व इतर मान्यवरांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. अभिनेता सलमान खानचे सिद्दीकी कुटुंबाशी निकटचे संबंध आहेत. बिश्नोई टोळीने यापूर्वी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. नियमित धमक्या आणि गोळीबाराच्या घटनेमुळे मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली असून सिद्दीकी यांची सुरक्षा वाढवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीविरोधात यापूर्वी कोणता गुन्हा दाखल आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd