मुंबई: मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत मुंबई पोलिसांनी बोरिवलीतील कंत्राटदार शेरसिंह मोहनसिंह राठोर यांना गुरूवारी अटक केली. मिठी नदीतील गाळ काढण्याचा पुरावा म्हणून आरोपीच्या कंत्राटदाराने ६७ छायाचित्रे सादर केली होती. त्याच्या पडताळणीत छायाचित्रातील गाळ प्रत्यक्षात इमारतीचा राडारोडा असल्याचे निष्पन्न झाले. गंभीर बाब म्हणजे आरोपीच्या कंपनीने उपसा केलेल्या गाळासाठी भिवंडी व पनवेल येथील तीन जागा मालकांशी सामंजस्य करार केला होता. त्यातील एक जागा मालकाचा करार करण्याच्या चार महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
शेरसिंह यांच्या मे. मनदीप एन्टरप्रायजेस या कंपनीला मिठी नदीच्या गाळाचे कंत्राट प्राप्त झाले होते. त्याबाबत महापालिकेकडून शेरसिंह यांच्या कंपनीला कंत्राटाचे २९ कोटी ६३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. ही रक्कम पुढे कोणापर्यंत पोहोचली, याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत व्यक्तीसोबत सामंजस्य करार
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार आरोपीने कचराभूमी म्हणून भिवंडी व पनवेल येथील तीन जागा मालकांशी सामंजस्य करार केला होता. त्यातील एक करार भास्कर तरे यांच्या सोबत १ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात हा करार करण्यापूर्वी चार महिने आधी म्हणजे ५ जानेवारी २०२१ रोजी तरे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामळे हा करार बनावट असल्याचा आरोप शेरसिंह यांच्यावर आहे.
मिठी नदीतील गाळ काढल्यानंतर त्याचे छायाचित्र महापालिकेला सादर करणे अनिवार्य होते. संबंधित छायाचित्र पालिकेच्या डब्ल्यूएमएस या ॲप्लिकेशनमध्ये साठवले जातात. पोलिसांनी केलेल्या पडताळणीत आरोपीने ६७ छायाचित्रे सादर केली असून त्यात गाळाऐवजी इमारतीचा राडारोडा असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
उपलब्ध नसलेल्या यंत्रे भाडेतत्त्वावर घेतली
आरोपीने वर्गो स्पेशालिटी प्रा.लि.चे जय जोशी व केतन कदम यांच्याकडून सिल्ट पुशर व ट्रक्सर भाडेतत्त्वावर घेतल्याचा करार सादर केला होता. पण प्रत्यक्षात जोशी व कदम यांच्या कंपनीकडेच ती यंत्रे उपलब्ध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील २० वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यातील अनेकांची चौकशी करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांच्या एसआयटीने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाखांंचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करीत आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विधान परिषदेत या प्रकरणी चौकशीची घोषणा करण्यात आली होती. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाला लक्ष्य करण्यासाठी हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका व एमएमआरडीएशी संपर्क साधला असून कंत्राटाच्या तपशिलांची मागणी केली आहे. नदीच्या उगमस्थळापासून पवई ते कुर्ला या ११ किमी ८४० मीटरच्या सफाईची जबाबदारी महापालिका व उर्वरित ६ किमी ८०० मीटरची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. पोलिसांच्या चौकशीत या संपूर्ण कामांसाठी एकूण १८ कंत्राटदार आतापर्यंत नेमण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील पाच कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मध्यस्थांनाही अटक केली होती.