मुंबई : एकेकाळी नामांकित महाविद्यालयात इंग्रजी शिकवणारा प्राध्यापक परिस्थितीमुळे चक्क चोर बनल्याचे उघडकीस आले आहे. नोकरी गेल्यानंतर उपजीविकेसाठी त्याने चोरीचा मार्ग पत्करला. बोरिवली स्थानकात एका प्रवाशाचा मोबाइल चोरताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. शुभ्रत श्रीवास्तव असे या प्राध्यापकाचे नाव आहे.

बोरिवली स्थानक कायम गजबजलेले असते. तेथून उपनगरीय लोकलबरोबर लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तेथे जागोजागी सीसी टीव्ही कॅामेरे बसविण्यात आले आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी नियंत्रण कक्षातून सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तेथील हालचालींवर लक्ष ठेवतात. संध्याकाळी रेल्वे सुरक्षा बलाचा एक कर्मचारी नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर निरीक्षण करीत होता. त्यावेळी एका कॅमेऱ्यात त्याला संशयास्पद दृश्य दिसले. फलाटावर झोपलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून एक व्यक्ती मोबाइल काढत असल्याचे त्याला आढळले. या पोलीस कर्मचाऱ्याने तात्काळ तेथे धाव घेतली आणि मोबाइल चोरणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली.

प्राध्यापक बनला चोर

या चोराची चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आरोपीचे नाव शुभ्रत श्रीवास्तव (५४) असून तो मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. अटक झाल्यानंतर चौकशीदरम्यान श्रीवास्तवने पोलिसांना सांगितले की, त्याचे वडील मोठे अधिकारी होते. मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे परिस्थिती हलाखीची झाली होती.

शुभ्रत श्रीवास्तव एम.ए. व बी.एड. पदवीधर असून इंग्रजीचा प्राध्यापक आहे. पूर्वी तो भाईंदर आणि कांदिवली येथील महाविद्यालयात इंग्रजी शिकवत होता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने नोकरी सोडली. नोकरी गेल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली. घरही सोडावे लागले. तो वसईतील हॉटेल आणि लॉजेसमध्ये राहत होता. नंतर पैशांची कमतरता भासू लागल्यानंतर त्याने मोबाइल चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याच्याविरोधात बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीवास्तवने यापूर्वीही अशी चोरी केली आहे का याचा शोध घेतला जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेकर यांनी सांगितले. सध्या आरोपी प्राध्यापक न्यायालयीन कोठडीत आहे.

दररोज ३० ते ३५ मोबाइलची होते चोरी

मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. लोकलमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरी केली जाते. रेल्वेमधून २०२४ मध्ये ११ हजार १४३ मोबाइल चोरण्यात आले होते. म्हणजेच महिन्याला साधारण ९५० आणि दिवसाला सरासरी ३० मोबाइल फोनची चोरी होत आहे. चालू वर्षातील जानेवारी ते मे या कालावधीत ३ हजार ५७६ मोबाइलची चोरी झाली आहे. म्हणजे या वर्षी देखील महिन्याला सातशेहून अधिक मोबाइल फोन चोरण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांवर वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.