Mumbai Weather Forecast Today मुंबई : मुंबईसह इतर भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने सुधारीत अंदाज जाहीर केला असून, सुधारीत अंदाजानुसार हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईतही मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार , आज मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. हा इशारा ११:३० पर्यंत असेल. त्यानंतर पुन्हा सुधारीत अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येईल. या कालावधीत ढगांच्या गडगडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील.
त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दिवसभरात मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून काही भागात कमी वेळात अधिक पावसाची शक्यता आहे. यामुळे पाणी साचून वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाचा जोर पहाटेपासून असल्याने सकाळी कार्यालय गाठण्यासाठी नोकरदार वर्गाला कसरत करावी लागली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.
मुंबईची आत्तापर्यंत स्थिती काय?
शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरल्यामुळे भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परळ रेल्वे स्थानक,कुर्ला या भागात पाणी साचले आहे.
मुंबईत २४ तासांत झालेला पाऊस (रविवारी सकाळी ८:३० ते सोमवारी सकाळी ८:३०)
कुलाबा- १३४.४ मिमी
सांताक्रूझ – ७३.२ मिमी
राज्याची स्थिती
मुंबई बरोबरच आज रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. त्यानुसार या भागातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, पनवेल भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
कमी दाब क्षेत्र पोषक
विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुढील दोन दिवस तरी राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.