शनिवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत मुंबईत हाहाकार उडाला. अतिवृष्टी झाल्यानं मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं. मुंबई आणि उपनगरांतील काही रस्त्यांना तर ओढ्याचं स्वरूप आलं होतं. लोकल सेवेलाही पावसामुळे फटका बसला. महत्त्वाचं म्हणजे चेंबूर आणि विक्रोळीत घरं कोसळून प्रचंड जीवितहानी झाली. तुंबलेली मुंबई आणि झालेल्या दुर्घटनांवरून भाजपा नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. विरोधकांकडून झालेल्या टीकेला आता शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मुंबईतील स्थितीकडे विरोधकांचं लक्ष वेधलं आहे. तसंच भाजपा नेत्यांवर निशाणाही साधला आहे. “मुंबईतील डोंगरउतारांवरील वसाहतींमध्ये लाखापेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. गेल्या २० वर्षांत त्यातील २०० पेक्षा जास्त लोकांचा दुर्घटनांमध्ये जीव गेला आहे. ही डोंगरउतारावरील घरे काय किंवा जुन्या धोकादायक इमारती काय, मुंबईचा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे. मुळात मुंबईच्या स्वतःच्या भौगोलिक मर्यादा आहेत. त्याच्या विपरीत लोकसंख्येचा भार या शहराला पेलावा लागत आहे. आधीच जागेची मर्यादा आणि त्यात अमर्याद मानवी लोंढे यामुळे मिळेल तेथे, जमेल तसे राहा हे समीकरण दृढ झाले. मानवी लोंढे न थांबल्याने मुंबईतील निवासाचे गणित अधिकच जटील झाले आहे”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Mumbai Rains : वातावरणीय बदलांमुळे मुंबईत वादळी पाऊस; रविवारी पहाटेपर्यंत २०० मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस

“डोंगरउतारांवरील शेकडो वसाहती आणि जुन्या धोकादायक इमारतींमध्ये ‘नोटिसा’ मिळूनही जीव मुठीत घेऊन राहणं, हे या गणिताचं सामान्य जनतेचं अपरिहार्य उत्तर आहे. मुंबई महापालिका आणि प्रशासन त्यांचं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न आपल्या परीने करीत असले तरी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यात अलीकडील वर्षांत मुंबईतील पावसाची लहरही फिरली आहे. ‘कमी वेळेत प्रचंड पाऊस’ हे त्याचं वैशिष्ट्य झालं आहे. आताही मागील तीन दिवसांत मुंबईत तब्बल ७५० मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस कोसळला. जुलै महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस पडण्याची मागील १२ वर्षांतील ही चौथी वेळ आहे”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

हेही वाचा- Chembur Landslide : ..तर आणखी काही जणांचे प्राण वाचले असते!

“ज्या शनिवारी मुंबईत पावसाने ११ दुर्घटना घडल्या, ३० जीव घेतले त्या शनिवारी तब्बल २३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमी वेळेत पडणारा प्रचंड पाऊस कधी मालाड-मालवणीसारख्या, कधी डोंगरीसारख्या तर कधी चेंबूरसारख्या दुर्घटनांचा तडाखा मुंबईला देत आहे. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. १७ जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे”, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains chembur landslide 2021 rain landslide hit mumbai shiv sena bjp saamana editorial bmh