मुंबई : यंदा लवकर दाखल झालेल्या आणि सरासरीपेक्षा अधिक कोसळलेल्या मोसमी पावसाने मुंबईकरांती त्रेधातिरपीट उडवली आहे. सप्टेंबरअखेरीस पावसाचा जोर ओसरला, मात्र पुढील दोन – तीन दिवस पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारपर्यंत मुंबईत अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत यंदा मोसमी पाऊस वेळेआधीच म्हणजे २६ मे रोजी दाखल झाला. पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांची दैना उडवली होती. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस सातत्याने कोसळत होता. जून महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस पावसाने ओढ दिली. जुलै महिन्यातही सारखीच परिस्थिती होती. या दोन्ही महिन्यांतील ठराविक काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे दोन्ही महिन्याची सरासरी पावसाला गाठता आली.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात मुंबईत बऱ्यापैकी पाऊस पडला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदा मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, सध्या पावसाला पोषक वातावरण असल्यामुळे मुंबईत बुधवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्य़ाची शक्यता आहे.
पावसाचा परतीचा प्रवास कधी
मुंबईत साधारण ८ ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. मात्र, अनेक वेळा निर्माण झालेली हवामान प्रणाली मोसमी पावसासाठी अनुकूल असते. त्यामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता असते. यंदा बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन वेळा निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र, त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तयार झालेले ‘शक्ती’ चक्रीवादळ यामुळे पावसाच्या परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी मुंबईतून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली होती. २०२३, २०२२ मध्ये २३ ऑक्टोबर रोजी, २०२१ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी, तर २०१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला होता.
आतापर्यंत पडलेला पाऊस
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ जून ते ६ ऑक्टोबरदरम्यान २८२५.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३५२२.१ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या हंगामात २०९४.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. तसेच सांताक्रूझ येथे २३१८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा दोन्ही केंद्रावर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षीही लवकरच
गेल्या वर्षी मुंबईत ९ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. म्हणजेच नेहमीच्या वेळेपेक्षा एक – दोन दिवस आधी पाऊस आला होता. २०२३ मध्ये उशीरा म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. २०२२ मध्ये ११ जून, २०२१-९ जून, तर २०२० मध्ये १४ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता.