मुंबई: मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये शुक्रवारी अतिमुसळधार (ऑरेंज अलर्ट) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या कालावधीत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. तसेच यावेळी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मुंबईत शनिवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री मुंबईत पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. काही भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. वरळी, परळ, दादर, भायखळा, घाटकोपर, विक्रोळी या भागात मुसळधार पाऊस पडला. त्याचबरोबर बोरिवली, जोगेश्वरी आणि अंधेरी परिसरातही पावसाचा जोर होता. वाऱ्याचा वेग पुढील दोन दिवस तुलनेने अधिक असल्याचे फांद्या पडणे, फलक पडणे अशा दुर्घटनांचाही धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

वादळी वारा व पावसामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या शेकडो मासेमारी बोटी किनारी परतल्या आहेत.

कमी दाबाचा पट्टा

पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून रविवारपर्यंत राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

कोकणातील रत्नागिरी आणि रायगडमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर दोन ते तीन दिवस कायम राहील. त्याचा परिणाम नवी मुंबईतील काही भागांत दिसू शकतो. त्याचबरोबर सिंधुदुर्गातही सलग पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील.

काही भागांत पूरजन्य स्थितीचा अंदाज

मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.