Mumbai Rain Updates : मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात अजूनही उन्हाचा चटका कायम आहे. दरम्यान, बुधवारपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून, पटियाला, बरेली, लखनौ, गोरखपूर, पटणा ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा परिसरावर, कच्छ आणि परिसरावर, तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात बुधवारी हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. याचाच परिणाम म्हणून बुधवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यावेळी प्रतितास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील.

मुंबईत पाऊस नाहीच

मुंबईसह ठाणे भागात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, दिवसभरात पाऊस पडला नाही. याउलट उकाडा आणि उन्हाचा ताप अधिक होता. सकाळी ११ वाजल्यानंतर उन्हाचा तडाखा होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३१.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील तापमान १ अंशाने अधिक नोंदले गेले होते.

ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक

ब्रम्हपुरी येथे मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मागील काही दिवसांपासून या भागात तापमानाचा पारा चढा आहे. याखालोखाल अकोला येथे ३४.४ अंश सेल्सिअस, अमरावती ३३.६ अंश सेल्सिअस, नागपूर ३३.८ अंश सेल्सिअस आणि डहाणू येथे ३२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पावसाचा अंदाज कुठे

मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, जालना, परभणी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव

अतिमुसळधार पावसाचा इशारा

यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा

हलक्या सरी

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर