मुंबई : मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या पथकर सवलतीपोटी ठेकेदाराला पथकर वसुलीचा कालावधी तीन वर्षे म्हणजे १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई प्रवेशद्वाराच्या सायन – पनवेल मार्गावर वाशी येथे, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे, ऐरोली पुलाजवळ, तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील नाक्यांवर ऑक्टोबर २०२४ पासून पथकरातून सवलत देण्यात आली आहे. ही सवलत दिल्यामुळे एमईपी कंपनीने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे नुकसान भरपाई म्हणून ९११ कोटींची मागणी केली होती. मात्र कंपनीला थेट रक्कम देण्याऐवजी पथकर वसुलीचा कालावधी वाढवून देण्याची शिफारस यासंदर्भात गठीत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती.
त्यानुसार एमईपी कंपनीला मुंबईच्या प्रवेशव्दारावरील पाचही पथकर नाक्यावर आता सप्टेंबर २०२९ पर्यंत पथकर वसुली करता येणार आहे. सध्याचा कालावधी २०२६ पर्यंत होता. तसेच मुंबई व उपनगर विभागातील २७ उड्डाणपुले व अनुषंगिक बांधकामांची निगा व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे.
वाशी खाडीपुलासाठी टप्प्याटप्प्याने रक्कम
वाशी खाडीपूल या प्रकल्पासाठी पथकर सवलत नुकसानभरपाईपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २७८१ कोटी रुपयें भरपाईची मागणी केली होती. महामंडळास भरपाईऐवजी खाडी पूल क्रमांक ३ च्या प्रकल्पाची सुमारे ७७५ कोटी ५८ लाख रुपयांची किंमत टप्प्या-टप्प्याने रोख स्वरूपात देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.