मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात जाण्यास विलंब झाला. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १० ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. अंधेरी येथे गुरुवारी सकाळी ८.२२ च्या सुमारास पाॅइंटमध्ये बिघाड झाल्याने धीमी अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे चर्चगेट आणि बोरिवली, विरार दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागल्या.

पाॅइंटमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दुरूस्तीचे काम हाती घेतले. तब्बल २० मिनिटांनी म्हणजे सकाळी ८.४२ वाजता हे काम पूर्ण झाले. परंतु, दुरूस्तीच्या कामाला २० मिनिटांचा अवधी लागल्याने, पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल संथगतीने धावत होत्या. तर, काही लोकल रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे नोकरदारांना कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली.

‘रोज मरे, त्याला कोण रडे’

मध्य रेल्वेवरील लोकल गुरुवारी सकाळी नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. कसारा, आसनगाव, टिटवाळा, खोपोली, कर्जत, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे येथून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील पनवेल, बेलापूर, वाशीवरून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल ५ ते १० मिनिटे उशिरा धावत होत्या.

रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना फटका

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात वेळेत पोहोचणे आवश्यक असते. लोकलवर अवलंबून असलेल्या या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाडाचा फटका सहन करावा लागला. तसेच रुग्णांना रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाला.

ॲप आधारित कॅब बंदचा फटका

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात ॲप आधारित कॅब बंद असल्याने प्रवाशांना बेस्ट आणि मीटर रिक्षा-टॅक्सीवर अवलंबून राहावे लागले. लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे नोकरदारांची चांगलीच कोंडी झाली.

यापूर्वीही पश्चिम रेल्वेवर पाॅइंट बिघाडाची घटना पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. २ जुलै रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल एका मागे एक उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले होते. हे काम रात्री ८ च्या सुमारास पूर्ण झाले. परंतु, या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दुरुस्तीनंतर तासभर लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तर, काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.