मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ घरांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ८६४ घरांचा समावेश असलेल्या पाच इमारतींसाठी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास निवासी दाखला (ओसी) घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून या घरांचा ताबा येत्या १५ दिवसांत देण्याचे मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे नायगावमधील रहिवाशांचे हक्काच्या, ५०० चौ फुटांच्या घरात रहाण्यास जाण्याचे स्वप्न दिवाळीदरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथे पहिल्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींतील ५५६ रहिवाशांना घराचा ताबा देण्यात आला आहे. तर नायगावमध्ये पहिल्या टप्प्यात आठ पुनर्वसित, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन इमारतींचे काम सुरू आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ८६४ घरांचा समावेश असलेल्या पाच पुनर्वसित इमारतींचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे.

तर आता या घरांचा ताबा देण्याच्या दृष्टीने पुढील तयारीला मंडळ लागले आहे. या पाच इमारतींसाठी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यासाठी मंडळाने अर्ज केला आहे. लवकरच अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ८६४ घरांसाठी निवासी दाखला घेण्यात येईल आणि येत्या १५ दिवसांत रहिवाशांना घराचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नायगावमधील ८६४ घरांचा ताबा येथील भूखंड २ वरील पात्र ८६४ रहिवाशांना देण्यात येणार आहे. या घरांसाठी याआधीच मुंबई मंडळाकडून सोडत काढून कोणत्या रहिवाशांना कोणत्या मजल्यावर कोणती सदनिका द्यायची हे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या ८६४ रहिवाशांचे २३ मजली इमारतीतील ५०० चौ फुटांच्या घरात वास्तव्याला जाण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या रहिवाशांची दिवाळी नवीन घरात साजरी होणार आहे.

नायगाव बीडीडी चाळ ६.४५ हेक्टर जागेवर वसली असून यात ४२ चाळी आहेत. या ४२ इमारतींत ३,३४४ घरे आहेत. या ४२ चाळींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजली २० पुनर्वसित इमारतीत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आठ इमारतींपैकी पाच इमारतीचे काम पूर्ण झाले असून या इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करून घरांचा ताबा देण्यात येणार आहे.