केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नारायण राणे आज विधीमंडळात आले होते. त्यांनी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खेडमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे हे स्वत: खोके मास्टर आहेत, अशी टीका नारायण राणेंनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणेंच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. राणे यांना स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंवर टीका करावी लागते, अशी उपरोधिक टोलेबाजी भास्कर जाधव यांनी केली. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- ठाकरे गटाचे उरलेले १५ आमदारही शिंदे गटात जाणार?; नारायण राणेंचं सूचक विधान, म्हणाले…

‘उद्धव ठाकरे हे खोके मास्टर आहेत’ या नारायण राणेंच्या विधानाबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “नारायण राणेंना माहीत आहे, आपण जी-जी मंत्रीपदं घेतली, त्या मंत्रिपदातून राज्याला काही देऊ शकलो नाहीत. त्यामुळे राजकारणामध्ये स्वत:ची ओळख टिकवून ठेवण्यासाठी त्यांना हुकमाचा एक्का एकच दिसतो, तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे… नारायण राणे जर उद्धव ठाकरेंवर काही बोललो नाहीत, तर त्यांची दखल कुणी घेणार नाही, हे त्यांना माहीत आहे. ते कधी विस्मृतीत जातील, हे त्यांना स्वत:लाही कळणार नाही. त्यामुळे त्यांची गरज किंवा त्यांचा नाइलाज म्हणून त्यांना उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतं. ते बोलले तरच नारायण राणेंचं कर्तृत्व किती मोठं आहे, हे महाराष्ट्राला कळतं.”

हेही वाचा- “…तर जीभ जागेवर राहणार नाही”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंची एखादी सभा किंवा पत्रकार परिषद घेतली की नारायण राणे प्रसारमाध्यमांसमोर जातात. याशिवाय नारायण राणेंचा स्वत:चा असा काही कार्यक्रम आहे का? गेल्या सहा-सात वर्षांत नारायण राणेंना कुणी सभेसाठी बोलावलं का? किंवा त्यांनी स्वत: एखादी सभा आयोजित केली का? त्या सभेला २५ माणसं जमली का? तर अजिबात नाही. त्यामुळे आता मी जे विधान केलं ते याच्याशीच सुसंगत आहे. नारायण राणेंना स्वत:चं अस्तित्व आहे, हे लोकांच्या लक्षात राहावं, यासाठी उद्धव ठाकरेंशिवाय त्यांच्याकडे दुसरा हुकमी एक्का नाही. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना प्रेससमोर वेडं-वाकडं बोलत असतील. पण पाठीमागे ते उद्धव ठाकरेंना धन्यवाद देत असतील. मी तुमचं नाव घेतोय म्हणून मी टिकून आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane may be thanking behind uddhav thackeray bhaskar jadhav reaction rmm