मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळी पुनर्विकासाअंतर्गत एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र ही मागणी म्हाडाकडून मान्य होत नसल्याने अखेर आता रहिवाशांनी उपमुख्यमंत्री, तसेच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचे निवेदन दिले. या प्रकरणात लक्ष घालावे, अशी सूचना रहिवाशांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाने म्हाडाच्या मुंबई मंडळातील मुख्य अधिकाऱ्यांना केली.

मुंबई मंडळ वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास करीत आहे. या पुनर्विकासात वरळीतील पुनर्वसित इमारतीत एका घरामागे वाहनतळात एक जागा देण्यात आली आहे. त्यामुळे वरळीतील रहिवाशांचा वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पण ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी प्रकल्पात दोन घरामागे वाहतळात एक जागा देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही चाळींतील रहिवाशांमध्ये नाराजी आहे. दोन्ही प्रकल्पांत वरळीप्रमाणे एका घरामागे वाहनतळातील एक जागा द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

नायगावमधील रहिवाशांना दुसऱ्या टप्प्यात एका घरामागे वाहनतळातील एक जागा देण्याचे आश्वासन म्हाडाकडून देण्यात आले आहे. पण ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. या मागणीकडे म्हाडा लक्ष देत नसल्याने रहिवाशांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांना पुनर्विकासाची माहिती आणि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रहिवाशांनी आपल्या मागणीबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना या प्रश्नी लक्ष घालावे, अशी सूचना करण्यात येईल असे आश्वासन रहिवाशांना देण्यात आल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीने दिली. पुनर्वसित इमारतीच्या बांधकामात काही त्रुटी असून त्या दूर करण्याची मागणीही यावेळी रहिवाशांनी केली.