मुंबई : राज्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची सलग दोन दिवस भेट घेऊन बोगस मतदारासंदर्भात समाधानकारक उत्तर मिळाले नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
‘शिवसेना भवन’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, ‘माकप’चे प्रकाश रेड्डी उपस्थित होते. दुबार मतदार वगळण्यासाठी आयोग काय कार्यक्रम हाती घेणार? ज्यांचे पत्ते नाहीत त्या मतदारांचे काय करणार आहात, हा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे. लोकशाहीबद्दल ज्यांना आस्था आहे, त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केले. काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील, असे सचिन सावंत यांनी सांगितले. मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ‘मविआ’तील इतर नेते करणार आहेत.