मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला मठाकडे परत नेण्याची मागणी होत असतानाच आता पेटा इंडियाने माधुरी हत्तीणीची जुनी ध्वनिचित्रफीत गुरुवारी समाजमाध्यमावर प्रसिद्ध करीत ती सध्या सुरक्षित ठिकाणी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
पेटा इंडियाने गुरुवारी समाजमाध्यमावर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीची २०२२ मधील ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. एका मिरवणुकीदरम्यान माधुरी हत्तीणीने माणसावर हल्ला केल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसत आहे. दरम्यान, सध्या माधुरी ज्या ठिकाणी आहे, तिकडे ती सुखरूप आहे आणि तिची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मात्र, ती ज्या मठात होती, त्या मठातील नागरिकांना अजूनही तिला साखळदंडात बांधलेले पहायचे आहे, म्हणून तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
पेटा इंडियाने गुरुवारी इन्स्टाग्रामवर माधुरी हत्तीणीची ध्वनिचित्रफीत प्रसारित केली आहे. ध्वनिचित्रफीत १३ मे २०२२ रोजीची असून मिरवणुकीदरम्यान माधुरीने एका माणसावर हल्ला केला आहे. दरम्यान, ही ध्वनिचित्रफीत प्रसारित करताना ३३ वर्षांनंतर माधुरीला न्याय मिळाला. ती आता चांगल्या ठिकाणी आहे. तेथे तिची उत्तम काळजी घेतली जात आहे. तरीदेखील मठाला माधुरी पुन्हा का हवी आहे, असे सवाल उपस्थित करीत, मठात यांत्रिक हत्तीचा वापर करावा असे नमूद करण्यात आले आहे.
नेटकऱ्यांचा विरोध
पेटाने प्रसारित केलेल्या या ध्वनिचित्रफीतीला नेटकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. माधुरी ३३ वर्ष मठात होती. तिथे अनेकांसोबत तिने चांगले नाते निर्माण केले आहे. तरीदेखील २४ तास पिंजऱ्यात बंद असण्याला तुम्ही सुखात आहे असे कसे म्हणू शकता. तसेच काहींनी पेटा नक्की प्राण्यांसाठी लढा देते की इतर कोणासाठी असा प्रश्न उपस्थित केला.
फेरविचार याचिका
माधुरी हत्तिणीचा ताबा परत मिळविण्यासाठी नांदणी मठाच्या व्यवस्थापनाकडून आणि राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्यात येणार आहे. या याचिकेत सहभागी होण्याचा निर्णय वनतारा व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले होते. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तिणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असे स्पष्टीकरण गेल्या महिन्यात वनतारा व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले होते.
१२ सप्टेंबरच्या सुनावणीच्या वेळी काय झाले ?
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. परंतु, हत्तीणीला नांदणी मठात पाठवण्यासंदर्भात तूर्त कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हे प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. आम्ही उच्चस्तरीय समितीला पुरावे सादर करताना त्यामध्ये ही ध्वनिचित्रफीत दाखवली. दरम्यान, नागरिकांना कळावे यासाठी माधुरीची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचे पेटा इंडियाचे हिरज लालजनी यांनी सांगितले.