मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्या मतदारसंघांमध्ये ‘रोड शो’ करण्याची मागणी महायुतीच्या सहाही उमेदवारांकडून करण्यात येत असताना केवळ ईशान्य मुंबईतील घाटकोपरपुरताच तो सीमित ठेवण्यात आला आहे. शिंदे गटाच्या तिन्ही उमेदवारांच्या मतदारसंघात मोदींचा ‘रोड शो’ होणार नाही. पंतप्रधान मोदी हे बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दिंडोरी आणि कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडल्यावर मोदी सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. घाटकोपर (प.)मधील एलबीएस मार्गावर अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिरापर्यंत सुमारे अडीच किमी अंतरात हा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मोदींच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रावर अन्याय; शरद पवार यांची टीका; कांजूरमार्ग येथे प्रचारसभा

घाटकोपरचा हा सर्व भाग ईशान्य मुंबई मतदारसंघात येतो. मोदी यांचा ’रोड शो’ ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याच मतदारसंघात होणार आहे. .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार यांच्यासह मंत्री, शहरातील सर्व आमदार-खासदार व अन्य पदाधिकारी रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. या रोड शोमुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती होईल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. मोदी यांची शिवाजी पार्क येथे १७ मे रोजी सभा होणार आहे. पण त्याआधी रोड शोही व्हावा, यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न होते. यानुसार उद्या ‘रोड शो’ होत आहे. मोदी केवळ घाटकोपर म्हणजे मिहिर कोटेचा उमेदवार असलेल्या मतदारसंघातील एका भागाचा दौरा करणार आहेत. मुंबईतील सहा जागांपैकी प्रत्येकी तीन जागा भाजप आणि शिंदे गट लढत आहेत. मोदी यांच्या रोड शोसाठी आपल्या मतदारसंघाचा समावेश व्हावा, असा शिंदे गटाचा आग्रह होता. पण केवळ ईशान्य मुंबई मतदारसंघापुरताच हा दौरा नियोजित असल्याने शिंदे गटाच्या उमेदवारांची मागणी मान्य झालेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi road show in ghatkopar on may 15 zws