मुंबई: राज्यातील महायुती सरकारला सुजलाम महाराष्ट्रातील शेती, उद्योग वाढविण्याची, तरुणांना अधिकाधिक रोजगार देण्याची काळजी नसून राज्यातील उद्याोग गुजरातला कसे जातील याचीच चिंता अधिक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादाने राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेऊन या राज्यावर अन्याय केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.
मोदी हुकूमशाहीच्या दिशेने पावले टाकत असून हे लोकशाहीवरील, तुमच्या मूलभूत अधिकारांवरील संकट असल्याने ते रोखावेच लागेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ कांजूरमार्ग येथे आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, खासदार चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते. लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे.
हेही वाचा >>> दलित, ब्राह्मण आणि दोन ओबीसी! वाराणसीमध्ये उमेदवारी भरताना मोदींचे प्रस्तावक कोण होते?
लोकशाहीने चालणाऱ्या जगभरातील देशांमध्ये भारताचे स्थान अव्वल असून ही लोकशाही संकटात गेल्यास जगातील लोकशाही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच अमेरिकेसह जगातील अनेक लोकशाहीवादी देशांना भारतातील लोकशाहीचे काय होते याची उत्सुकता आणि चिंता लागली असून त्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून पवार म्हणाले, आजवरच्या सर्वच पंतप्रधानांनी लोकशाही टिकली पाहिजे, लोकाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी भूमिका घेतली.
मोदी यांनी मात्र गेल्या १० वर्षात याच्या विपरीत कारभार केला असून लोकांना दिलेली किती आश्वासने त्यांनी पूर्ण केली. महागाई किती नियंत्रणात आणली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची ग्वाही दिली, पण आज देशात बेरोजगारीचे प्रमाण ८७ टक्के आहे. याचाच अर्थ मोदी सांगतात एक आणि करतात एक.दिलेला शब्द कधीच पाळत नाही असा आरोपही पवार यांनी केला. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती एकाच वेळी झाली असली तरी येथील सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्य हिताला प्राधान्य देऊन शेती, उद्याोग आदी सर्वच क्षेत्रात राज्याचा नावलौकिक वाढवला. पण विद्यामान सरकारचे राज्याच्या हिताची जपणूक करण्याकडे लक्ष नाही. राज्यातील उद्याोग गुजरातला कसे जातील याचीच त्यांना अधिक काळजी असल्याचा आरोप पवार यांनी केला.