मुंबई : पादचाऱ्यांचे मोबाइल चोरून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या एका सराईत टोळीच्या चुनाभट्टी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल ३० लाख रुपये किमतीचे मोबाइल जप्त केले असून या टोळीचे बांगलादेशापर्यंत धागेदोरे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

चेंबूर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाचा महिन्याभरापूर्वी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आयफोन पळवला होता. याबाबत तरुणाने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अशाच प्रकारे अनेक गुन्हे परिमंडळ ६ च्या परिसरात घडले होते. त्यामुळे या मोबाइल चोरांच्या अटकेसाठी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी एक विशेष पथक स्थापन केले.

या पथकाने तपास करून सचिन गायकवाड, तौसिफ सिद्धीकी, अमर शंकर, निसार हुसेन, सादिक अली, मुर्सीद सिद्धीकी या सहा आरोपींना मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून अटक केली. तर प्रदीप गुप्ता आणि अजिजूर रहमान या दोघांना कोलकत्ता येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आठही आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांच्याकडून ३० लाख ४८ हजार रुपये किमतीचे एकूण १८३ मोबाइल जप्त केले.

हे आरोपी मुंबई आणि नवी मुंबई परिसरात चोरलेल्या मोबाइलची विविध राज्यात, तसेच बांगलादेशात विक्री करती असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या प्रकरणी आणखी सहा आरोपींचा शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.