महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस आणि माजी आमदार प्रविण दरेकर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, दरेकर यांनी भाजपचे नवनिर्वाचित आमदार आशिष शेलार यांची भेट घेतल्याने या चर्चेला पाठबळ मिळाले आहे. वरळीतील ‘टेस्टी कल्पना’ हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ही गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. यामुळे मुंबईत आता मनसेला आणखी एक झटका मिळण्याची शक्यता आहे. मनसेमधून भाजपत प्रवेश करून घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राम कदम यांच्या माध्यमातून दरेकर हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दरेकर यांचा मागाठाणे विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. दरेकर यांच्याप्रमाणेच मनसेच्या सर्व माजी आमदारांचा पराभव झाला असून पक्षाने उभ्या केलेल्या २१९ उमेदवारांपैकी २०३ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. आमदारांनी काम न केल्यामुळे मनसेचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्यानंतर नाराज झालेल्या दरेकर यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला. यानंतर दरेकर यांनी राम कदम यांच्या माध्यमातून भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता आपण अजूनही ‘मनसे’मध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar meets ashish shelar