पुण्यात मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं. १९ मे च्या या प्रकरणात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जीव गेला. ज्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता अंजली दमानियांनी या प्रकरणात अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा सवाल करत अंजली दमानियांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

१९ तारखेची घटना नेमकी काय?

१९ मे च्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडलं. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणात संबंधित मुलाला अटक करण्यात आली. मात्र त्याला १५ तासांत जामीन मंजूर करण्यात आला. ज्यामुळे सोशल मीडिया आणि पुणे शहरांत संताप व्यक्त झाला.

यानंतर या प्रकरणात मुलाच्या वडिलांना आणि आजोबांनाही अटक झाली आहे. आज या प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले अशीही बाब समोर आली आहे. तसंच जनक्षोभ वाढल्यानंतर या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या सगळ्या घडामोडी मागच्या काही दिवसांमध्ये घडल्यानंतर आता अंजली दमानियांनी अजित पवार या प्रकरणी गप्प का? असा प्रश्न विचारला आहे तसंच एक आरोपही केला आहे.

हे पण वाचा- Pune Porsche Accident : पोर्श अपघातावरुन ‘तो’ प्रश्न येताच शरद पवारांचा संताप, “मी एखाद्या वकिलाला..”

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

“चार दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. ज्यात मी माझ्या मनातल्या शंका उपस्थित केल्या होत्या. पुण्यातल्या भीषण अपघातात दोन तरुण मुलांना जीव गमावावा लागला. अशात सगळी पोलीस यंत्रणा श्रीमंत मुलासाठी काम करत होती. त्याच्या मागे कोण आहे? ही शंका माझ्या मनात होती म्हणून ट्वीट डिलिट केलं होतं. पण ती शंका खरी आहे की काय? असं वाटतं आहे कारण काही पत्रकारांच्या पोस्ट मी पाहिल्या, वाचल्या. अजित पवारांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याचं काही जण म्हणत आहेत. हीच शंका माझ्याही मनात होती. कारण सुरुवातीचे चार दिवस अजित पवार काहीच बोलले नाहीत. मी रोज सकाळी उठून काम करतो वगैरे म्हणणारे अजित पवार अपघाताबाबत गप्प होते. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेचं नाव पुढे येत होतं. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती?”

सारवासारव कुणासाठी चालली आहे?

“सुनील टिंगरेंचं ऐकून पुणे पोलीस आयुक्त काही तरी वागतील असं वाटत नाही. सारवासारव कशासाठी चालली होती? पुणे पोलीस आयुक्तांनी हे स्पष्ट करावं की त्यांना अजित पवारांनी फोन केला होता का? केला नसेल तर उत्तम, केला असेल तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे” असं दमानियांनी म्हटलं आहे.

आता याबाबत अजित पवार काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवारांना जेव्हा अपघाताबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा कुणाचीही गय केली जाणार नाही असं अजित पवार म्ङणाले होते. मात्र आता अंजली दमानियांनी थेट अजित पवारांवरच आरोप केला आहे.