मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज काढण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे सोडत काढली जाणार आहे. कोणता प्रभाग आरक्षित होणार, कोणाचा प्रभाग खुला होणार हे निश्चित होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाबाबत अधिसूचना काढली आहे. यावेळी आधीचे आरक्षण विचारात न घेता नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील नॅशनल महाविद्यालयासमोरील ‘बालगंधर्व रंगमंदिरात ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर, शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, १४ ते २० नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग असून त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. तर अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २ , इतर मागासवर्गासाठी ६१ जागा राखीव असतात. या राखीव जागांमधील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात.

शाळेचे विद्यार्थी काढणार सोडत

सोडत काढण्याबाबतही निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रिया दिली आहे. त्यानुसार यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे सोडत काढली जाणार आहे. पारदर्शक अशा काचेच्या डब्यात २२७ प्रभागांच्या चिठ्ठ्या ठेवण्यात येणार असून त्यातून विविध आरक्षणाच्या सोडती काढल्या जाणार आहेत. २२७ प्रभागांसाठी सोडत काढण्याची ही प्रक्रिया यंदा दृकश्राव्यमाध्यमांद्वारे दाखवण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालणार आहे.

सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली

उमेदवारीच्या आशेने आणि त्याच आश्वासनावर दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना या आरक्षणामुळे फटका बसणार की नशीब साथ देणार याबाबत उत्सुकता आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदारसंघ आरक्षित झाल्यास इच्छुक उमेदवारांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. याचा फटका सर्वाधिक पुरुष उमेदवारांना बसणार आहे