मुंबई : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारखी (टीस) नावाजलेली संस्था राजकीय द्वेषाचे अजेंडे राबविण्याचे अड्डा होत असेल इतर संस्थांची काय परिस्थिती असेल ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

फाळणीच्या स्मृतीदिनानिमित्त ‘राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास’ आणि ‘टीस’ यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या उपस्थितीत ‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ या माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना, ‘देशातील लोकसंख्येचे बदलते गुणोत्तर चिंताजनक आहे. सर्वांसाठी समान नियम, हाच धर्म आहे,’ असे विधान आंबेकर यांनी केले होते.

या कार्यक्रमावर आक्षेप घेऊन रोहित पवार यांनी समाज माध्यमावर एक संदेश प्रसारित केला आहे. त्यात म्हटले आहे, ‘टाटा कुटुंबाने देश घडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी टाटा कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या कुटुंबाच्या नावाने असलेली संस्था जर अशाप्रकारे राजकीय द्वेषाचे अजेंडे राबविणार असेल तर ते संस्थेच्या नावाला साजेसे नाही. आज दिवंगत रतन टाटा हयात असते तर त्यांनी ‘टीस’ व्यवस्थापनाला या बद्दल नक्कीच खडे बोल सुनावले असते. सामाजिक कार्यासाठी, सामाजिक न्यायासाठी आग्रही असणारी ‘टीस’ मधील विद्यार्थी संघटना देखील आज निष्क्रिय दिसत आहे. ‘टीस’मध्ये नेमके काय चालले आहे ? संस्थेत कोण हस्तक्षेप करीत आहे का ? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

टीसला गौरवशाली इतिहास

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) ही मुंबईतील एक अग्रगण्य सामाजिक विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था आहे. १९३६ मध्ये सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क’ म्हणून तिची स्थापना झाली आणि १९४४ मध्ये तिचे नाव ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ असे ठेवण्यात आले. सामाजिक कार्य, समाजसेवा आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये संशोधन, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. टीसमध्ये विविध विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवते, ज्यात मानव संसाधन व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, विकास अभ्यास, शहरी आणि ग्रामीण नियोजन, बाल विकास, महिला अभ्यास आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांचा समावेश आहे. आपत्ती निवारण, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार या सारख्या क्षेत्रांमध्ये टीस सक्रियपणे कार्यरत आहे.