Sada Sarvankar Form Withdrawal: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातले २८८ मतदारसंघ हे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, काही उमेदवारांमुळे काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे मुंबईतला माहीम विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारे अमित ठाकरे हे केवळ दुसरे ठाकरे आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी भूमिका भाजपानं घेतली असताना शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेनंतर सदा सरवणकर थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यामुळे पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे महायुतीतील मोठा मित्रपक्ष भारतीय जनता पक्षानं अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. काही नेत्यांनी तर अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचंही जाहीर करून टाकलं आहे. पण दुसरीकडे माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर मात्र उमेदवारीवर ठाम असल्याचंच चित्र गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. मात्र, आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे संकेतच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिल्याचं बोललं जात आहे.

सदा सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा फोन!

आमदार सदा सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून त्यांची समजूत काढल्याचं खुद्द सरवणकरांनीच सांगितलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: कार्यकर्त्यांचा आदर करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी मला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला सांगितलं आहे. त्यामुळे माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईन”, असं सदा सरवणकर म्हणाले आहेत. आत्तापर्यंत उमेदवारीवर ठाम असणारे सदा सरवणकर मुख्यमंत्र्‍यांच्या फोननंतर ‘चर्चेनंतर निर्णय’ भूमिकेपर्यंत आल्यामुळे त्यांनी माघारीचेच संकेत दिल्याचं बोललं जात आहे.

उमेदवारीबाबत काय म्हणाले सदा सरवणकर?

“मी वैयक्तिक माझ्या फायद्यासाठी निवडणूक लढवत नाहीये. माझ्याबरोबर गेली अनेक वर्षं शिवसैनिक अहोरात्र परिश्रम घेतात, त्यांना विचारल्यानंतर मतदारसंघाची भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे माझ्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी मी बोलेन. आम्ही ५० गट तयार केले आहेत. ते प्रचार करण्यासाठी फिरत आहेत. मी त्या सगळ्यांना चर्चेसाठी बोलवलं आहे”, असं सदा सरवणकर यावेळी म्हणाले.

ठाम भूमिका की संभ्रम कायम?

दरम्यान, एकीकडे ठाम भूमिका घेतली असताना दुसरीकडे पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा असा संभ्रम सध्या सदा सरवणकरांबाबत निर्माण झाला आहे. “आमची भूमिका हीच आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा व्हावेत व महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत. जर मनसेमुळे आमचे काही उमेदवार पराभूत होणार असतील किंवा आमची संख्या कमी होणार असेल तर महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेणं मला आवश्यक आहे”, असं ते म्हणाले.

Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?

“एका जागेमुळे सगळं वातावरण खराब व्हावं असं मला वाटत नव्हतं. राज ठाकरेंबाबत आमच्या मनात प्रेम आहे. हे सगळं लक्षात घेऊन महायुतीचे आमदार वाढावेत ही माझी यामागची प्रामाणिक भावना आहे. अनेकदा आम्ही संघटनेच्या हितासाठी अशा प्रकारचा त्याग केला आहे. हा त्याग शिंदेंना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेण्यासाठी उपयोगी पडणार आहे का? याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. मी नेहमीच पक्षहिताचा निर्णय घेत आलो. जर मनसे सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील तर एका पदासाठी अडून राहणं हे संयुक्तिक होणार नाही”, असंही सदा सरवणकर म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sada sarvankar to withdraw nomination form from mahim assembly constituency against amit thackeray pmw