मुंबई : आरे जंगल वाचविण्यासाठी सुरु असलेल्या ‘आरे वाचवा’ आंदोलनाचा १५० वा टप्पा रविवारी पूर्ण झाला. या लढ्याला ३ जुलै २०२२ रोजी सुरुवात झाली असून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी संघर्षाची धार कायम ठेवली आहे.

‘आरे वाचवा’ हे आंदोलन दर रविवारी केले जाते. यामध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थ्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतात. आरेमधील मेट्रो कारशेडसाठी केलेली वृक्षतोड, जंगलाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी ‘आरे वाचवा’ हे आंदोलन सुरु आहे. या भागातील जैवविविधता, आदिवासी समाजाचा हक्क आणि पर्यावरणस्नेही विकासासाठी ही चळवळ केवळ संघर्ष न राहता जनजागृतीचेही माध्यम झाले आहे.

दर रविवारी आम्ही पर्यावरणासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवाज उठवतो. आरेमधील झाडांसाठी, पक्ष्यांसाठी आणि जंगलासाठी हा लढा आहे, तो शेवटच्या श्वासापर्यंत सुरु राहील असे मत पर्यावरणप्रेमी रेश्मा शेलटकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, या चळवळीमुळे पुढील पिढ्यांमध्येही पर्यावरणविषयी जागरुकता निर्माण होईल अशी आशा पर्यावरणप्रेमींना आहे.

आरे वाचवा आंदोलन काय

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३्’ साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या विरोधात ‘आरे संवर्धन गटा’कडून दर रविवारी ‘आरे वाचवा’ आंदोलन करण्यात येते. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३्’ साठी आरे वसाहतीत कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे आरे संवर्धन गट सक्रिय झाला आहे. या गटातील कार्यकर्त्यांनी कारशेडविरोधात आंदोलन सुरु आहे. आरे वसाहतीमधील पिकनिक पॉईंट येथे दर रविवारी आंदोलन करण्यात येते. यापूर्वी या आंदोलनात सायकल रॅलीही काढण्यात आली आहे.