मुंबई – विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱया ११ वर्षीय मुलीचा शाळेच्या बस चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी जुहू पोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक केली आहे.
सांताक्रुझ येथे राहणारी पीडित मुलगी ११ वर्षांची आहे. ती विलेपार्ले येथील एका नामांकित शाळेत शिकते. शाळेत ये-जा करण्यासाठी तिच्या पालकांनी खासगी व्हॅन लावली होती. आरोपी मुलांना शाळेत सोडण्याचे आणि घरी आणण्याचे काम करायचा. पीडित मुलीलाही तो घरापासून शाळेत सोडत होता.
शुक्रवारी पीडित मुलीने घरी येऊन पालकांना या प्रकाराबाबत माहिती दिली. चालक व्हॅनमधून उतरवत असताना अयोग्य पध्दतीने स्पर्श करत असल्याची तक्रार तिने केली. मुलीच्या पालकांनी सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठले. हा गुन्हा जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पीडित मुलीने पोलिसांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
जुहू पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी चालक गुलजार शेख याच्याविरोधात बालकांचे लैगिंक अत्याचार विरोधी कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. आरोपीने अन्य मुलींसोबत असा प्रकार केला आहे का त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांनी दिली.
