केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचं सरकार होतं तेव्हा तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची कारवाई होऊ नये अशी भूमिका घेतल्याची चर्चा कायम होत असते. यावर आता स्वतः शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी हा भाग अंशतः खरा असल्याचं म्हटलं. सुडाचं राजकारण करता कामा नये, अशी माझी आणि मनमोहन सिंग यांची भूमिका होती. त्याला तेव्हाच्या इतर काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. पवारांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “हो हे काहीअंशी खरं आहे. आम्हा दोघांचंही आग्रही मत होतं की आपण सुडाचं राजकारण कधी करता कामा नये. निवडणूक किंवा इतर मतभेद होतात. तेव्हा काय बोलायचं असेल तर ते करू, पण एका चौकटीच्या बाहेर आपण कधी जाता कामा नये अशी आमची भूमिका होती. आम्ही हे चौकटीच्या बाहेर जाऊ दिलं नाही. त्यावेळी आमच्या काही सहकाऱ्यांनी गुजरात सरकारमध्ये मंत्री असलेल्या लोकांविषयी वेगळी, टोकाची भूमिका घेतली. आमच्या विचाराशी सुसंगत ती भूमिका नव्हती ही वस्तूस्थिती आहे.”

“अनिल देशमुखांवरील अनेक आरोपांपैकी आता एकच आरोप शिल्लक”

“दुर्दैवाने आज जे सुडाचं राजकारण सुरू आहे ते ठीक नाही. अनिल देशमुख महाराष्ट्रात मंत्री होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर अनेक आरोप झाले त्यातील एकच आरोप आता शिल्लक राहिला ज्यावर विचार करावा लागेल. तो आरोप म्हणजे त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेला मदत करण्यासाठी कोणत्यातरी एका कंपनीकडून ४ कोटी रुपये घेतले. ती रक्कम शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाली. ती रक्कम सत्तेचा दुरुपयोग करून घेतली असा तो आरोप आहे. पण पैसे शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा आहे असं तपास यंत्रणाच सांगत आहेत,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“देशमुखांवरील कारवाईतून टोकाचा दृष्टीकोन दिसतो”

“आज (२९ डिसेंबर) अनिल देशमुख यांच्याविरोधात ७०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. या एका आरोपासाठी ७०० पानांचं आरोपपत्र दाखल करणं यातून या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन किती टोकाचा आहे हे दिसतं,” असंही पवारांनी नमूद केलं.

“काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार होते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात पाठवलं का?”

शरद पवार म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी केली. मी स्वतः सिताराम केसरी यांच्यासमोर उभं राहिलो, पण उत्तर भारतातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सिताराम केसरी यांना पाठिंबा दिला. दक्षिण भारतातील सहकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला. साहजिकच उत्तर भारतीय सहकाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मला यश आलं नाही ही वस्तूस्थिती आहे. महाराष्ट्रात येण्याचा निर्णय अजिबात माझा नव्हता.”

“…तेव्हा मी नरसिंहराव यांना कळवून परत दिल्लीला गेलो”

“बाबरी मशिदीचा प्रश्न आला आणि त्यानंतर दंगली झाल्या. जवळपास १४-१५ दिवस मुंबईचं जनजीवन उद्ध्वस्त झालं. तेव्हा मी संरक्षण मंत्री होतो. तेव्हा मला तुम्ही महाराष्ट्रात असला पाहिजे असं सांगण्यात आलं. मी आलो, पण माझ्या लक्षात आलं की अशा संघर्षात निर्णय घेणारी ऑथिरिटी एकच असली पाहिजे. तेव्हा मी आणि सुधाकरराव असे दोघे होतो. त्याचे दुष्परिणाम होतात असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी नरसिंहराव यांना कळवून परत दिल्लीला गेलो,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“तुम्ही गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सांगण्यात आलं”

शरद पवार पुढे म्हणाले, “नंतर मला पुन्हा यावं लागलं त्याचं कारण ही दंगल वाढली. तेव्हा वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली की मुंबई जाग्यावर आली नाही तर संपूर्ण जगात संदेश जाईल की हा देश स्थिरतेपासून बाजूला गेला आहे. जगात मुंबईला अधिक महत्त्व दिलं जातं. विशेषतः देशाची अर्थव्यवस्था मुंबईवर अवलंबून आहे. त्यामुळे मुंबई स्थिर झाली पाहिजे यासाठी मला पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलं गेलं. त्यांनी मला तुम्ही गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं सांगितलं.”

“…म्हणून मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला”

“माझी दिल्लीतून महाराष्ट्रात जायची अजिबात इच्छा नव्हती. जवळपास सहा-साडेसहा तास मला अत्यंत आग्रह करण्यात आला. शेवटी मला काही भावनिक गोष्टी सांगितल्या. ज्या राज्यात तुम्ही वाढला, ज्या राज्यातून तुम्ही इथपर्यंत आलात ते राज्य जळतंय. अशावेळी तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर याचं आम्हाला दुःख होतं असंही म्हटलं गेलं. त्यामुळे साहजिक त्या परिस्थितीत मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला,” असंही त्यांनी नमूद केलं.

“…म्हणून मी ११ बॉम्बस्फोट झालेले असताना १२ स्फोट झाल्याचं खोटं बोललो”

यावेळी शरद पवार यांनी मुंबईत ११ बॉम्बस्फॉट झाले होते आणि ते हिंदूबहुल भागात झालेले असतानाही मी जाणीवपूर्वक १२ स्फोट झाल्याचं खोटं सांगितल्याचीही आठवण सांगितली. मुंबईत धार्मिक दंगल होऊ नये आणि हे स्फोट एका धर्माच्या विरोधात आहेत असं वाटू नये म्हणून मी ते खोटं बोललो. यामुळे दुसऱ्या दिवशी मुंबई रुळावर आली, असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on role of himself and manmohan in avoiding central agency action against narendra modi pbs