मुंबई: दिल्लीत संसदेसमोर ३०० खासदार रस्त्यावर उतरले आणि देशात जे चाललेय त्याविषयीची स्वच्छ भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली. याआधी निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतली असेल. पण राष्ट्रीय गरज म्हणून आम्ही एक आहोत. देशाचे चित्र गंभीर असून लाेकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर संकट, त्याच्यावर हल्ला या गोष्टी दैनंदिन झाल्या आहेत. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना खोट्या कारणांनी अटक करून तुरुंगात टाकले जात असून प्रतिगामी शक्तींची देश आणि राज्य चालविण्यात घुसखोरी चालू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
यशवंतराव चव्हाण केंद्र येथे जनसुरक्षा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी देश आणि राज्य चालवण्याच्या प्रक्रियेेमध्ये प्रतिगामी शक्तींचा सुरू असलेला घुसखोरपणा हा शासनापुरता मर्यादित राहिलेला नाही तर न्याय संस्थेवरसुद्धा एक प्रकारचा हल्ला होतोय. भाजपच्या प्रवक्तेपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला न्यायदानाचा अधिकार दिला जात असल्याचे पाहण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस आणि सातत्याने हे घडतेय. जो काेणी पुरोगामी विचार मांडतो, त्यांच्यावर मात्र हल्ला केला जातो, अशी टीका त्यांनी केली.
जनसुरक्षा कायद्याला विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. हे होत असताना विधिमंडळामध्ये त्याला माहिजे तेवढ्या प्रभावीपणे विरोध करण्यात आला नाही. सुदैवाने विधान परिषदेत काही दुरुस्त्या केल्या गेल्या. हा कायदा तुमचा विचार, तुमचा मुलभूत अधिकार, याच्यावरही गदा येणार आहे, त्याच्यावर हल्ला होणार आहे. त्यामुळे जे काही विधिमंडळामध्ये घडले असेल, पण निदान महाराष्ट्राच्या कानकाकोपऱ्यामध्ये जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला यासंबंधित जागरूक करून या टोकाच्या प्रतिगामी शक्तींना संघर्ष करून दूर ठेवण्याबद्दलची काळजी घ्यावी लागेल, असे शरद पवार म्हणाले.
जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी तीव्र लढा देऊ- उद्धव ठाकरे
दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आणताना जात, पात, धर्म पाहू नका. जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोह हाच धर्म समजून त्याला फासावर लटकवा, आम्ही त्यासाठी पाठिंबा देतो. मात्र, जनसुरक्षा कायद्यात त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारने आणलेला कायदा रद्द करण्यासाठी तीव्र लढा देऊ, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. जनसुरक्षा कायदा किती वाईट आहे किंवा त्याचा दुरुपयोग हा सर्वसामान्यांवर केला जाऊ शकतो, हे जोपर्यंत सर्वसामान्यांना पटवून देत नाही तोपर्यंत जनसामान्यांमधून उठाव होणार नाही. आम्ही विरोधी असलो तरी सत्ताधाऱ्यांच्या सडलेल्या मानसिकेतच्या विरोधात असून देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे डाव्यांच्या व्यासपिठावर कसे असा प्रश्न उपस्थित केला तर कम्युनिस्ट आणि शिवसेनेचा एकेकाळी संघर्ष झाला होता. पण राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये, असे स्पष्ट करत मी, पवार, काँग्रेस, कम्युनिस्ट असे एकत्र का येऊ शकलो, तर आमच्या सर्वांच्या मनात देशप्रेमाचा एक समान धागा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
सरकार जन सुरक्षा कायदा कसा वापरणार हे दिसून येते. वसई-विरार पालिकेच्या माजी आयुक्तांच्या घरात पैसे सापडले म्हणून त्यांना अटक झाली , मग मंत्र्यांच्या घरात रोकड सापडली तर त्याला का अटक होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
पंतप्रधानपदावर नजर ठेवून फडणवीसांनी जनसुरक्षा कायदा आणला – हर्षवर्धन सपकाळ.
देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. फडणवीसांना दिल्लीत पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले आहे आणि गोळवलकर यांच्या विचारसरणीतला भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा सर्व खटाटोप करण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
मोदीनंतर पंतप्रधानपदासाठी उत्तरेतील एक बाबा पुढे आहे आणि तो पुढे गेला तर आपले अवघड आहे हे पाहून मायबोलीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही फडणवीस यांनी केले आहे. डावे उजवे असा वाद लोकशाहीसाठी चांगला असला तरी याविरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे. इंग्रजांनी जेल, मेल व रेल सुत्र वापरून राज्य चालवले होते आणि आत्ताचे सत्ताधारी सुद्धा तेच सुत्र वापरत आहेत.
या परिषदेतला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, आमदार विनोद निकोले, अजित नवले, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, उल्का महाजन, भालचंद्र कांगो, उदय भट, कमी. प्रकाश रेड्डी, राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.