भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. लातादीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अती महत्वाच्या लोकांमध्ये समावेश असणाऱ्या शाहरुख खानला आता ट्रोल केलं जात आहे. शाहरुखने त्याच्या धार्मिक मान्यतांनुसार केलेल्या एका कृतीवरुन चुकीचे दावे केले जात असून त्यावरुन त्याला ट्रोल करण्यात येत आहे. मात्र याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घडलं काय?
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही होता. मात्र शाहरुखने लतादीदींना अखेरचा निरोप देताना केलेली एक कृती सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड चर्चेत असून काहींनी शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा केलाय. 

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; राऊत म्हणाले, “स्मारक बनवणे सोपे नाही, त्या…”

लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या मंचावर शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. मात्र हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा काहींनी केला. अर्थात या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी शाहरुखवर टीका केली.

१)

२)

मात्र इस्लामची माहिती असणाऱ्या अनेकांनी हा दावा खोडून काढत शाहरुखने मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारल्याचं म्हटलं. एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते.

शाहरुख थुंकल्याचा दावा करणाऱ्या अनेकांना इतरांनी थोडी माहिती घ्या आणि मग बडबड करा असा खोचक सल्ला दिलाय. “शाहरुख थुंकला नाही. त्याने नकारात्मक शक्ती नष्ट व्हाव्यात म्हणून त्याच्या धार्मिक मान्यतेनुसार फुंकर मारली. माझ्याप्रमाणे लोकांनाही थोडं वाचलं तर त्यांना हे समजेल,” असं एकाने म्हटलंय. तर अन्य एकाने, “शाहरुखने लताजींसाठी दुवा मागितली आणि त्याने त्यांच्या पार्थिवाच्या सुरक्षेसाठी आणि आत्म्याच्या पुढील जन्मातील सुरक्षित प्रवासाठी प्रार्थना केली. मात्र तो थुंकल्याचा दावा करत नकारात्मकता पसरवणाऱ्यांच्या दर्जाहीन कृती निंदनीय आहे,” असं म्हटलंय.
१)

२)

३)

४)

दिग्दर्शक अशोक पंडीत यांनीही ट्विटरवरुन शाहरुखचा दुवा वाचताना फोटो ट्विट करत, “फिरंगी लोक शाहरुखवर सध्या खोटे आरोप करत तो लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीदरम्यान थुंकल्याचा दावा करतायत. अशा लोकांना लाज वाटली पाहिजे. त्याने प्रार्थना करुन पार्थिवावर फुंकर मारली. असं केल्याने पार्थिव सुरक्षित रहावं आणि पुढील प्रवासासाठी त्याच्यासोबत सकारात्मक ऊर्जा राहते, असं मानलं जातं. आपल्या देशामध्ये अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तीला अजिबात स्थान नाही,” असं म्हटलंय.

दरम्यान, यासंदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता ते चांगलेच संतापले. ज्या पद्धतीने शाहरुखला ट्रोल केलं जातंय तो नालायकपणा, बेशमरपणा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिलीय. तसेच पुढे बोलताना त्यांनी धर्म, जात, द्वेष यापलीकडे काही सुचत नाही, असाही टोला चुकीच्या माहीतीच्या आधारे शाहरुखची खिल्ली उडवणाऱ्यांना लगावलाय.

“हे कोण लोक आहेत? यांना थोडीही लाज नाहीय. हे निर्लज्ज लोक आहेत, जे अशावेळीही धर्म, जात यांचा राजकारणासाठी आधार घेतात. मी याची निंदा करतो. तुम्ही लताजींनाही सोडलं नाहीय,” असं राऊत म्हणाले.

“ज्यापद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जातंय, ते तिथे दुवा मागत होते. “तुम्ही लताजींनाही सोडलं नाहीय.” त्यांच्या पद्धतीने त्यांनी दुवा मागितली. त्यानंतर एका गटाचे, एका परिवाराचे लोक त्यांना ट्रोल करतायत, आयटी सेलचे लोक. हा काय प्रकार आहे. हा नालायकपणा आहे, हा बेशरमपणा आहे. तुम्ही एखाद्या महान व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा एखाद्या महान कलाकाराला ट्रोल करता. त्याची बदनामी करता. धर्म, जात, द्वेष यापलीकडे तुम्हाला काही सुचत नाही. तुम्ही देशाची वाट लावलीय,” असं राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut slams those who are trolling shah rukh khan over false allegation that he spit on lata mangeshkar mortal remains scsg