कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर ठपका ठेवण्यात आला. यानंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दिल्लीतील राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा केलेला कट आहे, असा आरोप केला. तसेच गडकरींना मोठी ‘ऑफर’ दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनायक राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा कट केला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेन. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी त्यांना दाखवावं.”

“आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”

“गडकरी त्यांना कशासाठी घाबरत आहेत. त्यांनी फक्त आवाज द्यावा. नितीन गडकरींनी ‘इंडिया’ आघाडीत यावं. आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील,” असंही विनायक राऊतांनी नमूद केलं.

हेही वाचा : VIDEO:”आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमतरता नाही, पण खरे जुने…”; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. विजय वडेट्टीवार म्हणाले होते, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.”

“कॅगच्या अहवालामागे नितीन गडकरींचं राजकारण संपवायचं हे कारण”

“नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, स्वच्छ प्रतिमा वगैरे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

हेही वाचा : VIDEO: “माझं वय झालं म्हणता, तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट

“केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार”

“कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray faction big offer to nitin gadkari amid corruption allegations pbs