मुंबई : आनंद दिघे यांचे नाव शिंदे गटाच्या राजकारणाचा आता ठाकरे गटाने दिघे यांचेच नाव वापरून ठाण्यातच काटशह केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राला आनंद दिघे यांचे नाव द्यावे यासाठी युवासेनेच्या ठाकरे गटाने आग्रह धरला आहे. व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजुरी मिळूनही दिघे यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर उपकेंद्राला दोन दिवसांत आनंद दिघे यांचे नाव न दिल्यास आम्हीच नामकरण सोहळा करू, असा इशारा ठाकरे गटाच्या युवासेनेने दिला आहे.

ठाणे जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाची ठाणे कल्याण अशी दोन उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांना शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे नाव देण्याचा ठराव काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झाला होता. मात्र अद्यापही दिवंगत आनंद दिघे यांचे नाव देण्यात आलेले नाही. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी आता दिघे यांच्या नावाचा आग्रह सुरू केला आहे. नाव देण्यास दोन दिवसांची मुदत दिली आहे.

‘कल्याण उपकेंद्राचे उद्घाटन झाल्यापासून कोणतीही विकासात्मक कामे व प्रगती झालेली नाही. तसेच कल्याण उपकेंद्रात कायमस्वरूपी केंद्र प्रमुखाची नेमणुक झालेली नसून जोशी – बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अतिरिक्त भार देण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संकुलाला फक्त एकच कर्मचारी आहे. तसेच आता दोन दिवसांत आनंद दिघे यांचे नाव न दिल्यास आम्हीच नामकरण सोहळा करणार आहोत’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

कल्याण उपकेंद्राची दुरवस्था

ठाणे आणि पुढील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून ठाणे आणि कल्याण येथे विद्यापीठाची उपकेंद्रे सुरू झाली. कल्याण उपकेंद्र २०१४ साली स्थापन करण्यात आले. मात्र जवळपास दहा वर्षे लोटल्यानंतरही कल्याण उपकेंद्रात आवश्यक सुविधांचा अभाव असल्याची तक्रार विद्याथ्यर्ांनी केली आहे. तेथे पूर्णवेळ केंद्र संचालक नाही. एकच स्वच्छता कामगार आहे. अस्वच्छता व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्यक्ष तासिका होत नाहीत. मोठे ग्रंथालय असूनही पुस्तकांची कमी, प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, अग्निशामन व्यवस्था नाही, आयडॉलचे अध्ययन साहित्य मिळत नाही, अनेक ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत आदी विविध समस्यांनी कल्याण उपकेंद्र वेढलेले असून विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे, असाही आक्षेप घेण्यात येत आहे.