मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे सायन कोळीवाडा, प्रतिक्षानगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाकरे यांच्या पक्षातील शिवसैनिकांनी शिवसेना शाखेत गर्दी केली होती. शाखेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कांबळे यांच्या छायाचित्राला यावेळी शिवसैनिकांनी काळे फासले.

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७३ चे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सायन कोळीवाडा परिसरातील दुसरा नगरसेवकही शिंदे यांच्या पक्षात गेल्यामुळे येथील शिवसैनिकांना धक्का बसला आहे.

यापूर्वी मंगेश सातमकर यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. रामदास कांबळे हे पक्ष सोडणार असल्याचे कळल्यानंतर सकाळपासूनच शिवसैनिकांनी शाखेत जमायला सुरुवात केली. यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांची संख्या मोठी होती. यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई हे देखील शाखेत आले. त्यांच्या दूरध्वनीवरून उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला व त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. जमलेल्या शिवसैनिकांनीही यावेळी उद्धव ठाकरे यांना आपण सोबत असल्याचा विश्वास दिला. नगरसेवक गेले पण कार्यकर्ते हलले नाहीत असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे हे देखील उपस्थित होते.

पोटनिवडणूकीतून कांबळे यांना नगरसेवक पद

रामदास कांबळे हे एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१७ च्या निवडणूकीत या प्रभागातून निवडून आलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक पार पडली होती. कांबळे यांनी कॉंग्रेसच्या सुनील शेट्ये यांचा पराभव केला होता.

किंग मेकर इकडे आहेत …

दरम्यान, रविवारी दुपारी शिवसेना शाखेत जमलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. तेव्हा कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना म्हणाले की रामदास कांबळे गेले तरी हरकत नाही किंग मेकर सगळे इकडेच आहेत. तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला आम्ही निवडून आणू असे आश्वासन यावेळी कार्यकर्त्यांनी दिले. सायन कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला ओळखला जातो. या भागात असणाऱ्या प्रतिक्षा नगर या मोठ्या संक्रमण शिबिरात मोठ्या संख्येने मराठी वसाहत असून मराठी मतदार शिवसेनेच्या पाठिशी असतात.