मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युती होणार हे निश्चित मानले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही भाऊ एकत्र लढतील. तेव्हा त्यांची ताकद दिसेल. ठाण्यात ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील. ठाण्यात दोन्ही बंधू ७५ चा आकडा पार करतील, असा दावा शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेना (ठाकरे) आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र निवडणूक लढणार आणि सत्तेवर येणार आहोत. आमचा नारा ७५ पार आहे. ते जे म्हणतील त्याच्यापेक्षा आम्ही पाच जास्त सांगू. दोन ठाकरे आहेत. दोन ठाकरे सब पे भारी. यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का? तो सोबत आहे का? पण या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील. जेव्हा दोन भाऊ एकत्र येतील तेव्हा आमची ताकद दिसेल, असे त्यांनी संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य केले. महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असे देखील ते म्हणाले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजून मनसेचा प्रस्ताव दिलेलाच नाही. त्यांची कार्य समिती असते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे.
स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष आहे. तो अजूनही तसाच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाऊपर्यंत विरला असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला.
याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा आहे. भाजप भाजपचा राहिला का? सगळे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये आले आहेत. स्वत:ची पोरे जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरे किती वेळ खेळवणार तुम्ही? असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांवर टीका केली.