मुंबई : लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचारार्थ दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर महायुतीची शुक्रवारी जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आलेल्या तैलचित्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विशेष बाब म्हणजे देव्हाऱ्यातील भारतमातेच्या मूर्तीला वंदन करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र ठाण्यातील २३ वर्षीय अद्वैत नादावडेकर या तरुणाने साकारले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुंबईत येणार होते. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, विचार, वारसा आदी गोष्टींचे दर्शन घडविणारी एक भेट पंतप्रधानांना द्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशा स्वरूपातील तैलचित्राबाबत अद्वैत नादावडेकर याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे’ या गीताला स्मरून अद्वैतला तैलचित्राची संकल्पना सुचली आणि ही संकल्पना मुख्यमंत्र्यांच्याही पसंतीस पडली. अवघ्या चार दिवसांत साकारलेले हे तैलचित्र तीन बाय चार फूट आकाराचे आहे. देव आणि देशाची सांगड घातलेल्या देव्हाऱ्यातील भारतमातेच्या मूर्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर वंदन करताना तैलचित्रात दाखविले आहे. हे तैलचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दादरमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी महायुतीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मोठी गडबड होणार”; दूरध्वनी करणाऱ्याला अटक

‘मला खूप अभिमान वाटतो आहे की एका तरुण चित्रकाराची दखल घेतली जाते. माझ्या कुंचल्यातून साकारलेले तैलचित्र महाराष्ट्र राज्याची भेट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले, याचा मला आनंद आहे. हे तैलचित्र अवघ्या चार दिवसांत साकारणे आव्हानात्मक होते. पण सर्वप्रथम तैलचित्राची संकल्पना स्वतःच नीट समजून घेतली आणि त्यावर आधारित तीन ते चार रेखाचित्रे काढून रंगसंगती कशी करायची हे ठरविले. लहानपणापासून चित्रकलेचा सुरू असलेला सराव आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे तैलचित्र पूर्णत्वास गेले’, असे अद्वैत नादावडेकर याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, फेब्रुवारी २०२४ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हाही अद्वैतने साकारलेले एक तैलचित्र पंतप्रधानांना भेट देण्यात आले होते. ‘स्त्री शक्ती’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या तैलचित्रात सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Video: “आज मी शपथ घेतो की…”, कार्यालयाबाहेरील राड्यानंतर मिहीर कोटेचा यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान; म्हणाले, “निवडून आल्यानंतर…”

अद्वैत नादावडेकर याचे शालेय शिक्षण मुलुंडच्या नालंदा पब्लिक स्कूल आणि बारावीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण कला शाखेतून वझे – केळकर महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्याने मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालयात प्रवेश घेत चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ‘बीएफए – बॅचलर ऑफ फाईन आर्ट’ ही पदवी प्राप्त केली. द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपतर्फे ‘ग्रॅण्ड प्राईज’, सर ज. जी. कला महाविद्यालयात शिकत असताना महाराष्ट्र शासनाचे विशेष वार्षिक पारितोषिक आदी विविध पुरस्काराने अद्वैतला गौरविण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या कला शिबिरासाठी अद्वैतची निवड करण्यात आली होती. तो सध्या मुक्त चित्रकार म्हणून कार्यरत असून विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकलेची प्रात्यक्षिके देत असतो. अद्वैतला लहानपणापासूनच चित्रकलेचे धडे मिळाले असून त्याचे वडील किशोर नादावडेकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आहेत. त्यांनी साकारलेली अनेक चित्रे ही राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये झळकली आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane s advait nadavdekar oil painting of veer savarkar gifted to pm narendra modi mumbai print news css