मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत, हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे, अशी परखड टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली.भाजपकडे कोणी आदर्शच नसल्याने त्यांचा वारसा हडपण्याचा डाव असून सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे हे आपलेच असल्याचा मतलबी दावा भाजप करीत आहे. हिंमत असेल, तर भाजपने मोदींच्या नावाने मते मागून निवडणुकीत उतरावे आणि मी वडील बाळासाहेबांच्या नावाने मागीन. महाराष्ट्र कोणाच्या बाजूने उभा राहील, हे एकदा आमनेसामने होऊन जाऊ दे, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे स्वातंत्र्यलढय़ात योगदान नाही की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत किंवा कोणत्याही लढय़ात सहभाग नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता सत्ताधारी पक्ष बाळासाहेबांचे तैलचित्र विधान मंडळात लावत आहेत. कृती चांगली आहे, पण त्यामागील उद्देश चांगला नाही. मला पक्षप्रमुखपदाची चिंता नसून जोपर्यंत कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे व त्यांच्या मनात आहे, तोपर्यंत या पदावर राहीन. गद्दार विकत घेतले जाऊ शकतात, पण खोके देऊन अशी गर्दी जमविता येत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अतिशय गोड माणूस असून मी दूरध्वनी करून त्यांचा सल्ला घेत असतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच केले. त्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, हिंदूत्व सोडून शरद पवार यांच्या कलाने जात असल्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असे शिंदे यांनी सांगितले होते. मग मी काय करीत होतो? एकदा मोदींचा माणूस आहे, सांगतात, तर चेहरा बाळासाहेबांचा घेतात. त्यांचे नेमके कोणते बोलणे खरे मानायचे? आमचे वडील चोरता, स्वत:च्या वडिलांना लक्षात ठेवा, असा टोमणा ठाकरे यांनी लगावला.

भाजपचे हिंदूत्व थोतांड
भाजपचे हिंदूत्व थोतांड असून त्याआडून देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. हिंदूत्वाच्या नावाने पोलादी भिंत उभी करायची आणि पकड निर्माण करायची, हा प्रयत्न असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. तत्पूर्वी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी नरिमन पॉइंट येथील बाळासाहेबांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आशीष शेलार यांचे प्रत्युत्तर
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण म्हणजे वैचारिक स्वैराचार असून त्यांना भाजपवर बोलण्याचा अधिकारच नाही, असे प्रत्युत्तर मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी सोमवारी दिले. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर केलेल्या टीकेसंदर्भात शेलार म्हणाले, मला सर्व गोष्टी मांडायच्या नाहीत. ठाकरे यांना कुटुंब एकत्र टिकविता आले नाही, पक्षातील नेते सोडून गेले, स्वत:चे सरकार टिकवण्यामध्ये अपयश आले, त्यांनी आम्हाला शिकवू नये.

ठेवींवर डोळा
आपणच सुरू केलेल्या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केले, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, महापालिकेचा पैसा बँकेत मुदतठेवीत न ठेवता विकासकामांवर खर्च केला पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले. यामागे काय उद्देश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महापालिकेचा अर्थसंकल्प २००२ पर्यंत तुटीचा होता, त्या वेळी ६४५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पण आम्ही पालिकेचा कारभार सुधारून बँकेत मुदत ठेवी ठेवल्या. त्यातून सागरी किनारपट्टी मार्ग व अन्य प्रकल्प होत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticism that it is impossible for bjp to get votes in the state without balasaheb thackeray amy