मुंबई : सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावातील प्रदूषण रोखण्यात मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करू, असा इशारा पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीचे प्रमुख रोहित जोशी यांनी दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या (एम. सी. मेहता गंगा प्रदूषण प्रकरण) आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१८ मधील आदेशानंतरही प्रशासनाने या तलावाकाठी धार्मिक विधी करण्य़ावर बंदी घातलेली नाही. इतकेच नाही तर बाणगंगा मंदिर ट्रस्टने स्वत: बाऊन्सर्स नेमून गणपती विसर्जन रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबतीत निष्क्रियच होते, असे रोहीत जोशी यांनी सांगितले. दरम्यान, दरवर्षी बाणगंगा तलावाकाठी धार्मिक विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.

गेल्या काही वर्षांत या तलावाची लोकप्रियता वाढल्याने दिवसेंदिवस धार्मिक विधी करायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हल्ली अस्थी विसर्जनासाठीही नागरिक तलावाकाठी येत आहेत. यंदा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करण्यात येणाऱ्या विधींमुळे बाणगंगा तलाव प्रदूषित झाल्यास पालिका, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, तसेच जिल्हा प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याची तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीने दिला आहे. याचबरोबर सोसायटीने या तक्रारीत बाणगंगा तलाव व इतर नैसर्गिक जलाशयांमध्ये धार्मिक विधींच्या साहित्य विसर्जनावर त्वरित लिखित बंदी आदेश द्यावेत. सर्वपित्री अमावस्येदरम्यान नैसर्गिक जलाशय परिसरात पोलीस व महापालिका कर्मचारी तैनात करावेत. पर्यायी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

माशांचा मृत्यू

बाणगंगा तलावात गेली अनेक वर्ष मृत माशांचा खच आढळून येतो आहे. साधारण सर्वपित्री अमावस्येनंतर ही घटना घडत असल्याचे सांगतिले जाते. त्यामुळे याआधी देखील स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही यात कोणतेही बदल झालेले नाहीत. परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप सर्व स्तरांतून केला जात आहे.

पालिकेची वायूविजन व्यवस्था फोल

दरवर्षी या काळात तलावातील मासे मरतात. यासाठी गतवर्षी पालिका प्रशासनाने तलावासाठी वायूविजन व्यवस्था केली होती, तसेच पूजा विधीचे साहित्य गोळा करणारे एक यंत्रही तलावात सोडले होते. मात्र पालिका प्रशासनाचे हे सगळेच प्रयत्न फोल ठरले आहेत.

पुनरुज्जीवन प्रकल्प

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलाव व परिसराचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला असून या कामासाठी १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

वर्षानुवर्षे चाललेला हा निष्काळजीपणा आता सहन केला जाणार नाही. आपल्या तलावांचे रक्षण करणे ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नाही तर घटनात्मक कर्तव्यदेखील आहे. – रोहित जोशी, येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटी