नागपूर : शिंदे- फडणवीस सरकारकडून जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज दिवसभाराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीची सकाळी बैठक झाली. जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई रद्द केली पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. परंतु ते करीत नसल्याने आम्ही कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेतला. कर्नाटक सरकार महाराष्ट्र विरोधी ठराव घेत आहे. त्याच्या विरोधात सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी आम्ही अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांकडे केली. हे सरकार कर्नाटकला घाबरत आहे.

हेही वाचा: चर्चा तर होणारच! ऐन अधिवेशन काळात राज ठाकरेंची नागपुरात ‘एन्ट्री’

भूखंडाचा घोटाळा दाबण्यासाठी विरोधकांचे आवाज बंद करीत आहे. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. कर्नाटकच्या विधानसभेत सीमावादाबाबतचा ठराव घेतला. परंतु हे सरकार ठराव घेण्यासाठी का घाबरत आहे, असा सवाल करीत सोमवारी सीमावादावर सरकारने ठराव घेतल्यास आमचा त्याला पाठिंबा राहिल, असे ते म्हणाले. सभागृहात शेम शेमच्या घोषणा देण्यात येते. शेम शेम चा अर्थ मराठीत काय, असाही सवाल त्यांनी केला. जयंत पाटील यांनी सरकारला उद्देशून म्हटले होते. परंतु त्यांना अडवण्यासाठी अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाई केली. ‘काय निर्लज्जपणा चालवलाय’ या जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून त्यांना हिवाळी अधिवेशनपुरते निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडीने गुरुवारी सभात्याग केला होता. तीच भूमिका कायम ठेवत आज शुक्रवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला.

‘एयू’ म्हणजे अनन्या उदास

सत्तापक्ष गैरसमज पसरवित आहे. काल एयू वरून त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. अनन्या ही माझी मैत्रिण असल्याचे तिचे म्हणणे आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,’ असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: Maharashtra Assembly Session: उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोन कॉलची चौकशी होणार? शंभूराज देसाई म्हणाले “गुप्तचर विभागाकडून…”

मिंधे सरकार विरोधात घोषणा देणाऱ्या विरोधात गुन्हे- आव्हाड

काल ठाण्यात आंदोलन झाले. शिंदे सरकार, मिंधे सरकार’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा देणाऱ्यांना आता अटक होत असल्याची माहिती आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिस आयुक्तांना तसा फोन करून दबाव टाकला जात आहे. आम्ही गांधींना मानणारे आहोत. अटकेला आम्ही घाबरत नाही. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सरकारचे ‘सत्तामेव जयते’- आदित्य ठाकरे

आम्ही सत्यमेव जयते हे तत्व मानणारे आहोत तर सरकार सत्तामेव जयते मानते. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकशाहीसाठी काळा दिवस: अशोक चव्हाण

जयंत पाटील यांचे निलंबन लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटक सरकार कुरघोडी करत असताना आपले सरकार काहीच करत नसल्याचा खेददेखील त्यांनी व्यक्त केला.