Maharashtra Local Body Elections 2025 / अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा अखेर मुहूर्त निघाला आहे. नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. राज्यातील २४७ पैकी २४६ नगर पालिकांची निवडणूक होणार आहे. अकोला जिल्ह्यातील एकमेव पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली. हद्दवाढीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे पातूर नगर पालिकेची निवडणूक घेण्याची प्रक्रिया रेंगाळली. त्यामुळे निवडणूक आयोगाने पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित ठेवली आहे. जिल्ह्यातील इतर नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

राज्यातील २४६ नगर पालिका व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. २ डिसेंबर रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. त्या दृष्टीने कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत, तर अपीलच्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबरला, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील २४७ पैकी २४६ ठिकाणी निवडणूक होणार आहे.

न्यायालयीन प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली आहे. पातूर नगर पालिकेच्या हद्दवाढ प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पातूर नगर पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला विलंब झाला. त्याचा परिणाम निवडणूक घेण्यावर झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित ठेऊन राज्यातील इतर नगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पातूर नगर पालिका वगळता अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी जाहीर झाल्याप्रमाणे निवडणूक होणार आहे.

पातूर नगरपालिकेची आरक्षण सोडत

पातूर नगर पालिकेची आरक्षण सोडत आज, ४ नोव्हेंबरला काढण्यात आली. नगर पालिका सभागृहात उपविभागीय अधिकारी निखील खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी राहुल कंकाळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते अ.जा., ना.मा.प्र. आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गांतील महिलांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले.

पातूर नगर पालिकेची आरक्षण सोडत झाली असून यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आक्षेप मागवले जातील. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग पातूर नगर पालिका निवडणूक घेण्यासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.